नेमकं घडलं काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे ओंकेश लोहार (वय 20) आणि त्याचा एक मित्र अशी आहेत. ओंकेश आणि पीडित महिला यांच्यात मागील सात-आठ वर्षांपासून ओळख असल्याचे समोर आले आहे. याच जुन्या ओळखीवरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वारंवार वाद सुरू होते. सोमवारी सायंकाळी पुन्हा काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तोच वाद एवढा चिघळला की, संतापाच्या भरात ओंकेश आपल्या मित्रासह पीडितेच्या घराचा दरवाजा तोडून आत गेला आणि लाकडी बॅट आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने महिलेला मारले.
advertisement
अचानक झालेल्या हल्ल्याने महिला किंचाळत मदतीसाठी ओरडू लागली. आवाज ऐकून शेजारी धावत आले, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. रक्तबंबाळ अवस्थेतील महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पीडितेच्या शेजारीणीनं दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेने कोनगाव परिसरात प्रचंड संताप पसरला आहे.
