एसी लोकलमध्ये असा प्रकार पुन्हा कसा?
रेल्वे प्रवासासाठी बनावट पास वापरल्याप्रकरणी ठाण्यातील अनिल पंजाबी (वय 20) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. या प्रकारानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 5 डिसेंबर रोजी रात्रीची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील तिकीट निरीक्षक प्रशांत कांबळे हे आपल्या अन्य सहकार्यांसोबत दादर-अंबरनाथ एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी करीत होते. साधारण रात्री 8:35 वाजता ते तिसऱ्या डब्यात तपासणीसाठी गेले असता त्यांना अनिल पंजाबी हा तरुण दिसला. त्यांनी त्याच्याकडे तिकीट किंवा पास दाखविण्याची मागणी केली.
advertisement
यावेळी अनिलने आपल्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप अॅपद्वारे एक पास दाखविला. हा पास युटिएसमधून तयार झाल्यासारखा दिसत होता. मात्र निरीक्षक कांबळे यांनी तो पास बारकाईने तपासला. मात्र तो बनावट असल्याचे त्यांना समजून गेले. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाचा मोबाईल ताब्यात घेतला आणि लगेच रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने त्याला ठाणे रेल्वे पोलिसांकडे न्हेले.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा पास त्याला एका मित्राने दिल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. पुढील तपासासाठी पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून बनावट पास वापरून प्रवास केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे.
