मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे.
दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक कार्यालयाच्या दिशेने ४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले, हल्लेखोरांनी त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोळीबारात वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. भरवस्तीत अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची सर्व दृश्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
advertisement
घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. मतदानाच्या अवघ्या ४८ तास आधी उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.
