हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावले. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पुलावर कैद झाली. शिवनी येथून नवरगावकडे एका चारचाकी वाहनाने काही लोक जात असताना त्यांना पुलावर वाघ उभा असलेला दिसला. त्यामुळे त्यांनी चार चाकी गाडी तिथेच थांबवली. मात्र त्याचवेळी मागून एक भरधाव दुचाकी पुलाकडे निघाली. दुचाकीस्वारांना तिथे वाघ असल्याचे लक्षात आले नाही. दुचाकी अगदी जवळ आल्यावर वाघाने हल्ल्याचा पवित्रा घेतला मात्र दुचाकी वेगात असल्याने तिथून पुढे निघून गेली. ही सर्व घटना चारचाकी मध्ये बसलेल्या लोकांनी मोबाईल मध्ये चित्रित केली ती समाज माध्यमावर वायरल झाली आहे.