ओमने बी.कॉमची पदवी घेतलेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नाशिकमधील एका नामांकित कंपनीत काही वर्षे काम देखील केलं. पण, नोकरीमध्ये त्याचं मन रमत नव्हतं. इतरांची चाकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, या विचाराने त्याच्या मनात घर केलं होतं. नोकरी करत असताना त्याने अनेकदा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न बघितलं. शेवटी एक दिवस धाडस दाखवून त्याने राजीनामा दिला आणि खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
ओम नाशिकमधील गोल्फ क्लब परिसरात नाचणीची इडली, नाचणी ढोकळा, मेथी थेपला यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा स्टॉल लावतो. या व्यवसायात त्याचे आई वडील देखील त्याला मदत करतात. नाचणी इटली आणि नाचणी ढोकळा हे दोन पदार्थ नाशिकमध्ये फक्त ओमच्या स्टॉलवर मिळतात.
ओम म्हणाला, "माझी आई शिक्षिका आहे. ती नेहमी बघायची की, मुलं शाळेत डब्याला नेहमी फास्ट फूड घेऊन येतात. काही पालक तर डबाही देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये अनेक मुलं मार्केटमध्ये जे मिळेल ते खातात. यातून कल्पना सुचली की, जर आपणच पौष्टिक पदार्थांची विक्री केली तर मुलांचा फायदा होईल."
ओमने आपली कल्पना आई-वडिलांना सांगितली. त्यांनी देखील मुलाला पाठिंबा दिला. ओमचा फूड स्टॉल नाशिकमध्ये प्रसिद्ध झाला असून त्याच्याकडील पदार्थ खाण्याासाठी लोक गर्दी करतात. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून तो महिन्याला 50 हजार रुपयांची कमाई करत आहे.





