सांगली: जत्रा किंवा यात्रा हे भारतीय ग्रामीण समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जत्रेच्या काळात त्या त्या देवतेच्या पूजाअर्चा तर होतातच. परंतु जत्रेच्या या धार्मिक बाजूसोबतच तिला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा देखील बाजू असतात. महाराष्ट्रातील काही जत्रा तर विशिष्ट जनावरांच्या व्यापारासाठीच प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक म्हणजे सांगली जिल्ह्यातील आटपाडीची श्री उत्तरेश्वराची यात्रा. या यात्रेतून शेळ्या मेंढ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असल्याने ती शेळ्या-मेंढ्यांची यात्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे. नेमकी कशी असते ही यात्रा? याचा लोकल18 च्या प्रतिनिधींनी घेतलेला हा सविस्तर आढावा.
advertisement
आटपाडीतील या प्रसिद्ध यात्रेमध्ये पूर्वी माणदेशी खिलार बैलांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत होती. अलीकडच्या दोन-चार वर्षांमध्ये गाई, म्हशी आणि खिलार बैलांऐवजी शेळ्या आणि मेंढ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अलीकडे माडग्याळी मेंढ्या या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. बेळगाव, सांगली, सातारा ,कोल्हापूर, सोलापूरसह कर्नाटक राज्यातून अनेक व्यापारी आणि शेतकरी शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. शेळ्या-मेंढ्यांची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आहे. यामुळे पशुपालकांना दर्जेदार शेळ्या-मेंढ्या खरेदी करता येतात. या यात्रेतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे ग्रामस्थ संतोष देशमुख यांनी सांगितले.
महाराष्टातलं असं गाव, जिथे भरते चक्क मेंढ्यांची यात्रा, येतात नवरी सारख्या नटून!
शेळ्या-मेंढ्यांच्या या यात्रेत 3-4 लाखांपासून 51 लाखापर्यंतचे सौदे होतात, अशी माहिती मार्केट समितीचे उपसभापती राहुल गायकवाड यांनी दिली. या यात्रेमध्ये आणि बाजारामध्ये आलेल्या जनावरांचा पाचपट भाव वाढत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला. तसेच आपल्या जनावराची योग्य ती किंमत शेतकऱ्यांना समजते, असे उपसभापती गायकवाड यांनी सांगितले. या यात्रेमध्ये उत्तम गुणवत्तेच्या शेळ्या-मेंढ्या मिळत असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमते.
माडग्याळी मेंढ्या यात्रेचं प्रमुख आकर्षण
माणदेशातील प्रसिद्ध माडग्याळी मेंढ्या या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. अडीच लाखांपासून 5 लाखांपर्यंत या मेंढ्यांच्या किमती आहेत. 3 दिवसाच्या कोकरापासून मोठ्या मेंढ्यांपर्यंत खरेदी-विक्री होते आहे. तब्बल 51 लाखांची बोली लागलेला माडग्याळी मेंढा यात्रेचं आकर्षण ठरतोय. रंगवलेल्या, सजवलेल्या शेळ्या-मेंढ्यांनी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपूर्ण आवार फुलून जाते. हौशी मेंढपाळ जातिवंत आणि दर्जेदार शेळ्या-मेंढ्यांना नटवून-सजवून, वाजत-गाजत यात्रेत घेऊन येतात.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी या दुष्काळी भागामध्ये पशुपालन हाच लोकांच्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आटपाडीचं ग्रामदैवत श्री उत्तरेश्वराच्या उत्सवानिमित्त कार्तिक पौर्णिमेपासून पुढे आठवडाभर यात्रेचा जल्लोष चालू असतो. याच यात्रेमधून पूर्वी स्थानिक प्रजातीतील खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये ‘माडग्याळी मेंढ्या’ यात्रेचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेमधून महाराष्ट्रासह कर्नाटकमधून शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करत असतात. अनेक पशुधन प्रेमी आपल्या जनावरांची वाजत गाजत मिरवणूक काढत यात्रा जल्लोषात साजरी करतात.