भागलपुर : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पावसात साप निघण्याच्या घटना अधिक प्रमाणात समोर येतात. त्यामुळे सर्पदशांने काही जणांना आपला जीव गमवावा लागला, अशाही घटना यापूर्वी घडल्या आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या पत्नीला साप चावल्यानंतर तो व्यक्ती बादलीत साप घेऊनच रुग्णालयात पोहोचला. यावेळी रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
advertisement
रुग्णालयात पोहोचल्यावर या व्यक्तीने डॉक्टरला म्हटले की, माझ्या पत्नीला वाचवा. माझ्या पत्नीला याच सापाने चावा घेतला आहे. ही घटना भागलपुरच्या मेडिकल कॉलेज येथील आहे. यामुळे रुग्णांच्या मनातही भीती निर्माण झाली होती.
नेमकं काय घडलं -
भागलपुरच्या सबौर परिसरातील झुरखुरिया गावातील 29 वर्षीय महिला निशा ही आपल्या घराची साफसफाई करत होती. त्याचवेळी तिला काहीतरी चावले, असा अंदाज आला. मात्र, पाहिल्यावर सापच होता. साप पाहिल्यावर निशाने आपल्या कुटुंबीयांना आवाज दिला. तसेच मला सापाने चावा घेतला आहे, असे सांगितले.
जीवघेणे रिल्स बनवत आहात, स्टंटबाजी करत आहात तर सावधान!, पोलीस करू शकतात ही कारवाई
साप त्यावेळी खोलीतच होता. निशाचा पती राहुल याने जेव्हा खोलीतील देवाचा फोटो बाजूला केला तर साप त्याच्या मागे लपलेला होता. राहुलने सापाला एका काठीने उचलून बादलीत टाकले. निशा ही बेशुद्ध होत होती. त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या राहुलने निशाला आपल्या दुचाकीवर बसवले आणि एका बादलीत तो साप टाकून दुचाकीच्या हँडलमध्ये ती बादली अडकवली आणि थेट पत्नीला घेऊन जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालय येथे आला.
डॉक्टरने केला उपचार -
त्याने डॉक्टरला सांगितले की, याच सापाने माझ्या पत्नीला दंश केला आहे. यानंतर डॉक्टरने निशाला उपचारासाठी आपत्कालीन विभागात पाठवले. यावेळी सापाला पाहून एकच गोंधळ उडाला होता. डॉक्टरने सांगितले की, हा संकरा जातीचा साप आहे. सापाचे विष आणि त्याच्या प्रजातीचे परीक्षण करून डॉक्टरांनी निशावर उपचार सुरू केले. तोपर्यंत तो तरुण दवाखान्यात त्या सापाला बादलीत घेऊन बसून राहिला. दरम्यान, निशाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, अजूनही साप रुग्णालयातच ठेवण्यात आला आहे.