खरगोन : साप मोठा असो किंवा लहान, समोर आला की भल्याभल्यांना धडकी भरतेच. आता तर साप बिळातून बाहेर येण्याचा कालावधीच जवळ आला आहे. तुम्हाला माहित असेल तर उन्हाळ्यात सर्पदंशाच्या घटना सर्रास कानावर येतात, पावसाळ्यात तर सापांचा जणू सुळसुळाट असतो. परंतु थंडीत मात्र साप अगदी गायब होतात. या ऋतूत सर्पदंशाच्या घटना क्वचितच घडतात. याचाच अर्थ असा की, आता साप बिळांबाहेर पडण्याचा काळ जवळ आलाय.
advertisement
मार्च महिनाअखेरीस ऊन पडायला सुरुवात होते. उन्हाळ्यात साप आधीसारखे ऊर्जावान होतात. अन्नाच्या शोधात ते शेतात, मानवी वस्तीत शिरतात. अशात त्यांना जिथं जिथं आपल्या जीवाला धोका आहे असं वाटतं, तिथं तिथं ते हल्ला करतात. सर्पमित्र सांगतात की, सर्पदंशाची सर्वाधिक प्रकरणं शेतांमध्ये आणि जलाशयांच्या आजूबाजूला घडतात. कधीकधी तर घरात, कपड्यांमध्येही साप आढळतात. त्यामुळे कपडे नेहमी झटकून वापरावे. मध्यप्रदेशच्या खरगोन भागातील सर्पमित्र महादेव पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सर्पमित्र सांगतात की, जसजसं ऊन वाढतं, तसतसे साप पाण्याच्या शोधात जलाशयं किंवा इतर थंड ठिकाणांच्या शोधात रहिवासी भागात पोहोचतात. म्हणूनच उन्हाळा सुरू होताच घरातील अंधारी, ओलसर जागा वेळोवेळी साफ करावी. तसंच या ऋतूमध्ये शेतात साप आढळण्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे या दिवसांमध्ये शेतातही अगदी काळजीपूर्वक काम करावं.
सर्पमित्र सांगतात की, साप हा असा प्राणी आहे जो उन्हाळा आणि पावसाळ्यात विशेष सक्रिय असतो. त्यामुळे या दिवसांत लहान, मोठे साप ठिकठिकाणी पाहायला मिळतात. परंतु थंड वारे वाहताच साप निद्रावस्थेत जातात. या स्थितीला म्हणतात Hibernation, यामध्ये साप शिकारीसाठी अजिबात वणवण भटकत नाहीत. ते काही खातही नाहीत. फक्त एका ठिकाणी थांबून स्वतःसाठी आसरा शोधतात आणि तिथंच डोळे बंद करून हळूहळू श्वास घेऊन विश्वांती घेतात. याच स्थितीमुळे त्यांना पुढच्या ऋतूत सक्रिय राहण्यास ऊर्जा मिळते.
सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साप जवळपास 3 ते 4 महिने या शीतनिद्रेत असतात. म्हणूनच त्यासाठी ते अत्यंत सुरक्षित अशी जागा शोधतात. पुढच्या ऋतूत जोमानं शिकार करता यावी याचसाठी ते या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा साठवून ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे दिवसेंदिवस काहीच न खाल्ल्यामुळे सापांच्या शरीरातली चरबी कमी होते. शरीर सडपातळ झाल्यानं ते आणखी वेगानं सरपटतात. याचाच अर्थ पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात आढळणारे साप अतिशय खतरनाक असतात.
