खरंतर सापांचं शरीर जसजसं वाढत जातं, तसतशी त्यांची जुनी त्वचा लहान पडते. ही त्वचा फारशी ताणली जात नाही, त्यामुळे साप काही काळानंतर ती बदलतात. यालाच "कात टाकणे" किंवा इंग्रजीत Molting असं म्हणतात.
फक्त त्वचा लहान पडल्यामुळेच नाही, तर त्वचेवर असलेली घाण, जखमा, परजीवी किंवा इतर संक्रमण टाळण्यासाठीही साप आपली कात टाकतात. थंड हवामानात त्यांना जाडसर त्वचा लागते तर गरम हवामानात बारीक, म्हणूनही ही प्रक्रिया उपयोगी ठरते.
advertisement
त्वचा बदलण्याआधी सापांची नजर धूसर होते कारण डोळ्यावर असलेली पारदर्शक गोष्टही निघणार असते. त्यानंतर साप स्वतःला झाडांवर किंवा खडकांवर घासून हळूहळू जुनी त्वचा काढतो. लहान साप दर 1-2 महिन्यांनी तर मोठे साप वर्षातून 2-4 वेळा त्वचा बदलतात.
साप महिनोमहिने न खाता कसे जगतात?
साप हे थंड रक्ताचे प्राणी (cold-blooded) असतात, म्हणजे त्यांच्या शरीराचं तापमान बाहेरील हवामानावर अवलंबून असतं. त्यामुळे त्यांना ऊर्जा फार कमी लागते. याचमुळे अनेक साप 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ उपाशी राहू शकतात.
ते आपल्या शरीरात विशेषतः शेपटी आणि पोटात, चरबी साठवून ठेवतात, जी गरजेच्या वेळी ऊर्जा म्हणून वापरली जाते. काही साप हिवाळ्यात हायबरनेशनमध्ये जातात, म्हणजे अगदी निष्क्रिय अवस्थेत राहतात. यावेळी ते काहीच खात नाहीत.
शिवाय साप मोठा शिकार एकदाच गिळतात, जो पचवायला त्यांना अनेक आठवडे लागतात आणि तोच ऊर्जा देत राहतो. रॅटलस्नेकसारखे काही साप तर 8 ते 12 महिने उपाशी राहू शकतात.
साप डोळ्यांनी पापण्या न मिटता किंवा मचकवता पाहतात. त्यांच्या डोळ्यावर एक पारदर्शक गोष्ट असते जी त्वचेसोबतच उतरते. याशिवाय साप जिभेने वास घेतात म्हणजे हवे मधील गंधकण टिपून ते जेकबसन ऑर्गनला पोहोचवतात आणि त्याद्वारे शिकार ओळखतात. त्यांचा जबडा अतिशय लवचिक असतो, त्यामुळे ते स्वतःपेक्षा मोठा शिकार गिळू शकतात. काही साप जसे कोब्रा, वायपर हे विषाने शिकार मारतात, तर अजगर आणि बोआसारखे साप श्वास कोंडून मारतात. पिट वायपरसारखे साप आपल्या तोंडाजवळील उष्णता सेन्सरमुळे अंधारातही शिकार शोधू शकतात.
जगात सुमारे 3 हजार सापांच्या प्रजाती आहेत, त्यापैकी केवळ 20-25% सापच विषारी असतात. भारतात प्रमुख विषारी साप म्हणजे कोब्रा, करैत, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर. तर अजगर, पायथन यासारखे साप विषारी नसतात.
अंटार्क्टिका, न्यूझीलंड आणि काही बेटं वगळता, साप जवळपास सर्व खंडांमध्ये आढळतात. भारतात शेकडो सापांच्या प्रजाती आहेत, पण त्यांचं अस्तित्व जंगलतोड, शिकार आणि अंधश्रद्धेमुळे धोक्यात आलं आहे.
साप दूध पित नाहीत
साप मांसाहारी असतात. ते दूध कधीही पित नाहीत. दूध पिल्यामुळे त्यांची तब्येत बिघडू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साप फक्त तेव्हा हल्ला करतात जेव्हा त्यांना स्वतःचा जीव धोक्यात वाटतो.
साप ही निसर्गाची एक विलक्षण निर्मिती आहे. त्यांना समजून घेणं, त्यांच्या अस्तित्वाचं रक्षण करणं आणि त्यांच्या विषयी पसरलेल्या चुकीच्या समजुती दूर करणं आपली जबाबदारी आहे.