Shravan 2025: दुसरा श्रावण सोमवार 4 ऑगस्टला; घरच्या घरी शिवपूजा करण्याचा शास्त्रोक्त विधी पहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: श्रावणातील सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्रावण सोमवारी शिवपूजा करण्याचा शास्त्रोक्त विधी जाणून घेऊ.
मुंबई : श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार 4 ऑगस्ट रोजी आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळतं. महादेवाच्या मंदिरात मोठी गर्दी जमते. श्रावणातील सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्रावण सोमवारी शिवपूजा करण्याचा शास्त्रोक्त विधी जाणून घेऊ.
पूजेसाठी लागणारे साहित्य: शिवलिंग किंवा शंकराचा फोटो, घरात धातूचे शिवलिंग असल्यास ते उत्तम. पाट किंवा चौरंग स्वच्छ वस्त्र आसन आणि पाटावर अंथरण्यासाठी. अभिषेकासाठी शुद्ध जल, दूध, दही, तूप, मध, साखर (पंचामृत).पूजा साहित्य म्हणून बेलपत्र, शमीपत्र, धतुरा, पांढरी फुले, दुर्वा. भस्म चंदन, अष्टगंध, अक्षता (अखंड तांदूळ).नैवेद्य म्हणून फळे, मिठाई किंवा सात्विक पदार्थांचा नैवेद्य उदबत्ती, निरांजन, कापूर, दिवा, कापूस. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ वाहण्यासाठी धान्य (तांदूळ, तीळ, मूग, जव).
advertisement
शिवपूजा विधी - सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजेच्या आसनावर बसून आज श्रावणी सोमवार व्रत करत आहे आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करत आहे. या व्रतामुळे माझ्या कुटुंबाला सुख-समृद्धी मिळो आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत' असा संकल्प करावा. प्रत्येक शुभ कार्याप्रमाणे प्रथम गणपतीची पूजा करावी. गणपतीला हळद-कुंकू, अक्षता आणि दुर्वा अर्पण करून नमस्कार करावा.
advertisement
शिवाभिषेक: शिवलिंगाला पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहावे. अभिषेक झाल्यावर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्याने स्वच्छ करावे. शिवलिंगाला स्वच्छ पुसून त्यावर चंदन, अष्टगंध आणि भस्म लावावे. शिवलिंगावर बेलपत्र, शमीपत्र, धतुरा आणि पांढरी फुले अर्पण करावीत. बेलपत्र वाहताना त्याचा देठ आपल्याकडे असावा. महादेवाला आवडणाऱ्या वस्तू, जसे की रुद्राक्ष किंवा नाग या मूर्तीही अर्पण करू शकता.
advertisement
शिवामूठ अर्पण: हा श्रावणी सोमवारचा एक विशेष विधी आहे. प्रत्येक सोमवारी खालीलप्रमाणे शिवामूठ वाहावी:
पहिल्या सोमवारी: एक मूठभर तांदूळ.
दुसऱ्या सोमवारी: एक मूठभर तीळ.
तिसऱ्या सोमवारी: एक मूठभर मूग.
चौथ्या सोमवारी: एक मूठभर जव (जवसाचे दाणे).
नैवेद्य आणि आरती: नैवेद्य दाखवून उदबत्ती, निरांजन आणि कापूर लावून महादेवाची आरती करावी. 'जय शिव ओंकारा' किंवा 'लवथवती विक्राळा' या आरत्या म्हणाव्यात.
advertisement
जप आणि प्रार्थना:
पूजा झाल्यावर काही वेळ शांत बसून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. आपल्या मनातील इच्छा आणि अडचणी महादेवाला सांगाव्यात. उपवास केला असेल, तर पूजा झाल्यानंतर तो उपवास सोडू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करून उपवास सोडावा. या पद्धतीनं पूजा केल्यास भगवान शिव नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कृपा करतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 2:24 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: दुसरा श्रावण सोमवार 4 ऑगस्टला; घरच्या घरी शिवपूजा करण्याचा शास्त्रोक्त विधी पहा


