Photo Vastu: घरात अशाप्रकारचे फोटो लावण्याची चूक महागात पडते, वास्तूदोष वाढून कुटुंबात ताण-तणाव
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips अनेकदा आपण भिंतीवर छान दिसतील म्हणून काही फोटो किंवा पेंटिंग लावतो, पण त्या फोटोंचा आपल्या आयुष्यावर आणि घरातील ऊर्जेवर काय परिणाम होतोय, हे आपल्याला माहीत नसतं.
मुंबई : आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि एकदा का घर उभं राहिलं की आपण ते अगदी मनासारखं सजवतो. पण घर सजवताना आपण फक्त सौंदर्याकडे बघतो, वास्तुशास्त्राचा विचार करायला अनेकजण विसरतो. अनेकदा आपण भिंतीवर छान दिसतील म्हणून काही फोटो किंवा पेंटिंग लावतो, पण त्या फोटोंचा आपल्या आयुष्यावर आणि घरातील ऊर्जेवर काय परिणाम होतोय, हे आपल्याला माहीत नसतं. यातही वास्तूनुसार सिंहाचा फोटो घरामध्ये लावण्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
सिंह हा जरी जंगलाचा राजा असला, तरी घराच्या भिंतीवर त्याचं चित्र असणं फारसं चांगलं मानलं जात नाही. वास्तुशास्त्रातील जुन्या ग्रंथांनुसार, घरातल्या प्रत्येक वस्तूचा तिथल्या माणसांच्या स्वभावावर परिणाम होतो. सिंह हा त्याच्या आक्रमकतेसाठी, रागीट स्वभावासाठी आणि वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीसाठी ओळखला जातो. जर आपण घराच्या आत सिंहाचा असा फोटो लावला ज्यात तो शिकार करतोय किंवा गर्जना करतोय, तर घरातील माणसांमध्ये चिडचिड वाढू लागते. छोट्या गोष्टींवरून वाद होणं किंवा घरात नेहमी तणावाचं वातावरण राहणं, असे प्रकार घडू शकतात.
advertisement
हिंस्त्र पशूंच्या प्रतिमा घरामध्ये नकारात्मकता पसरवतात असं मानलं जातं. यामुळे कुटुंबात एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात किंवा नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. प्रगतीच्या कामात अडथळे येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे घराची भिंत सजवताना रागीट प्राण्यांचे फोटो टाळलेलेच बरे. वास्तूनुसार फक्त हिंस्त्र प्राणीच नाही, तर गिधाड, घुबड, कबूतर, कावळा, बाज आणि बगळा यांसारख्या पक्ष्यांचे फोटोही घराच्या भिंतीवर लावू नयेत. हे पक्षी काही प्रमाणात अशुभ संकेतांचे प्रतीक मानले जातात.
advertisement
जर तुम्हाला घरामध्ये सकारात्मकता आणि सुख-शांती हवी असेल, तर काही खास फोटो तुम्ही नक्की लावू शकता. गाय आणि वासरू यांचा फोटो वात्सल्य आणि समृद्धीसाठी उत्तम मानला जातो. प्रगती आणि वेगासाठी 7 धावणारे घोडे असलेला फोटो लावता येईल. शक्ती आणि स्थिरतेसाठी हत्तीचा फोटो शुभ असतो, तर कासव, हंस किंवा मोर यांचे फोटो शांती आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. असे फोटो लावल्याने घरातली सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये आनंदी वातावरण राहतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 9:43 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Photo Vastu: घरात अशाप्रकारचे फोटो लावण्याची चूक महागात पडते, वास्तूदोष वाढून कुटुंबात ताण-तणाव










