किरकोळ वाद, पतीचं डोकं फिरलं, लोखंडी गज तापवला अन् पत्नीच्या..., बीडमध्ये धक्कादायक प्रकार
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: मुलांमधील किरकोळ भांडण थांबवण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्याने मिळून अमानवी छळ केला.
बीड: कौटुंबिक कलहातून विवाहितेला त्रास दिल्याचे प्रकार घडल्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहिती असतील. आता बीड जिल्ह्यातील बर्दापूर गावात एका विवाहितेवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांमधील किरकोळ भांडण थांबवण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्याने मिळून अमानवी छळ केला, असा आरोप असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी शहाजी मोरे (वय 23) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरात कपडे धुण्याचे काम सुरू असताना अश्विनीचा मुलगा शिवांश आणि दिराचा मुलगा सुरज यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. त्यावेळी सासरे मोहन साधू मोरे यांनी थेट शिवांशला मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
मुलाला मारहाण का केली जात आहे, असा सवाल अश्विनीने केला असता तिच्यावरच संताप व्यक्त करण्यात आला. पती शहाजी मोहन मोरे याने अश्विनीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. या हिंसाचारात सासू विजयमाला मोहन मोरे हिने गरम केलेला लोखंडी गज पतीच्या हातात दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement
पतीने तापलेल्या लोखंडी गजाने अश्विनीच्या डाव्या पायाच्या पोटरीवर तसेच हातावर एकूण पाच ठिकाणी चटके दिले. एवढ्यावरच न थांबता सासऱ्याने “हिला जिवंत पेटवून द्या” असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही तिला उपचारासाठी जाण्यापासून रोखण्यात आले.
अखेर अश्विनीने धैर्य दाखवत आपल्या वडिलांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. अंबाजोगाई येथे उपचार घेतल्यानंतर तिने बर्दापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118, 115 (2), 351 (2) व 3 (5) अन्वये पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समाधान भाजीभाकरे पुढील तपास करीत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 10:07 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
किरकोळ वाद, पतीचं डोकं फिरलं, लोखंडी गज तापवला अन् पत्नीच्या..., बीडमध्ये धक्कादायक प्रकार









