Cyber Crime: ‘गुगल’ सर्च महागात, सायबर भामट्याकडून 2 लाखांना गंडा, कशी झाली फसवणूक?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Cyber Fraud: सध्याच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. गुगल सर्च करणाऱ्या एका अधिकाऱ्याला सायबर भामट्यांनी 2 लाखांना चुना लावला.
छत्रपती संभाजीनगर: सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचीच नाही, तर अगदी उच्चशिक्षित लोकांची देखील फसवणूक होतेय. नुकतेच छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीच्या अधिकाऱ्याला देखील या सायबर गुन्ह्याचा फटका बसला आहे. ‘गुगल’वर हॉटेलचा शोध घेताना ते सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना जवळपास 2 लाख रुपयांचा चुना लागला आहे.
कशी झाली फसवणूक?
जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनी बिडकीनमध्ये 636 एकरांवर 27 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक मोठा प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी सहाय्यक उपाध्यक्ष कृष्णचंद श्रीवास्तव (वय 56) हे शहरात वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी कामाचा आढावा घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ शहरात येणार होते. त्यांच्या निवासासाठी कृष्णचंद यांनी गुगलवर जिंजर हॉटेलचा संपर्क क्रमांक शोधला. तेव्हा पहिल्याच पर्यायात आलेल्या क्रमांकावर त्यांनी कॉल केला. कॉलवरील व्यक्तीने स्वतःला हॉटेल जिंजरचा व्यवस्थापक सांगितले.
advertisement
ऑनलाईन पेमेंटवर सूटचे आमिष
कृष्णचंद यांना संबंधित सायबर भामट्याने ऑनलाईन पेमेंटवर 20 टक्के सूट देण्याचे आमिष दाखवले. कृष्णचंद यांच्याकडून क्रेडिट कार्ड क्रमांक घेतला आणि ओटीपीची मागणी केली. ओटीपी प्राप्त झाल्यानंतर बँकेने कृष्णचंद यांना संपर्क करून व्यवहाराबाबत खातरजमा केली. तेव्हा आपली फसवणूक होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बँकेच्या कॉलवरच व्यवहार थांबवण्यास सांगितलं. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी खात्यातून 1 लाख 90 हजार रुपये वळवले होते. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
advertisement
कशी होते फसवणूक?
'गुगल' सारख्या सर्च इंजिनमध्ये हॉटेल किंवा अन्य काहीही शोधल्यास काही वेळा एसईओ (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) च्या मदतीने सायबर गुन्हेगार खोट्या क्रमांकावर रैंकिंग मिळवून गुगलच्या सर्च फिडमध्ये प्रमुख स्थान मिळवतात. अनेकदा सायबर गुन्हेगार अॅडव्हर्टाइझमेंटसाठी पैसे देऊन खोट्या नंबरला पहिल्या स्थानावर ठेवतात. त्यामुळे हॉटेलऐवजी त्यांचा क्रमांक आणि ई-मेल आयडी पहिल्या फिडमध्ये दिसतो.
advertisement
तुमची फसवणूक होऊ नये म्हणून..
view comments'गुगल'वर सर्च करून आलेली माहिती खोटी किंवा सायबर गुन्हेगारांची असू शकते. सर्च रिझल्टवर विश्वास ठेवण्याआधी हॉटेल किंवा अन्य काहीही शोधताना, गुगलच्या पर्यायांपेक्षा संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर माहितीची खात्री करा. पहिल्याच सर्च रिझल्टवर क्लिक करू नका. तसेच ऑनलाईन पेमेंट करताना कुणालाही ओटीपी शेअर करू नका.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
March 28, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Cyber Crime: ‘गुगल’ सर्च महागात, सायबर भामट्याकडून 2 लाखांना गंडा, कशी झाली फसवणूक?


