भटक्या कुत्र्यांना पकडून दिल्यानंतर भयंकर घडतंय; संपूर्ण कुटुंब दहशतीत
- Published by:Priya Lad
Last Updated:
भटक्या कुत्र्यांना पकडून दिल्यानंतर कुटुंबासोबत भयंकर घडतंय.
आग्रा, 18 डिसेंबर : भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची अनेक प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला की त्यांना स्थानिक प्रशासन पकडून नेतं. पण अशाच भटक्या कुत्र्यांना पकडून देणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. या कुटुंबाचा आता जीव धोक्यात आहे. उत्तर प्रदेशमधील हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
आग्रामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्यावरून दोन कुटुंबात वाद झाला आहे. हा वाद इतका वाढला की भटके कुत्रे पकडून देणाऱ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे. जगदीशपुरा पोलीस स्टेशन परिसरातील गढ़ी भदौरिया त्रिवेणी नगरमध्ये राहणारे हे दोन्ही कुटुंब. कुत्र्यांवरून त्यांच्यात झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला.
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्रिवेणी नगरमध्ये पूरन सिंह नावाच्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे घर आहे. त्यांच्या घरासमोर वीरेंद्र सिंग उर्फ बच्चू नावाच्या तरुणाचे घर आहे. तो NCC (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) मध्ये चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी आहे. या दोन कुटुंबात वाद झाला. पूरण सिंह यांचा मुलगा मनीषनं सांगितलं की, 15 डिसेंबर रोजी त्यानं महापालिकेच्या कॅटर कॅचरमधून भटके कुत्रे पकडले होते. त्यामुळे समोर राहणारा वीरेंद्र उर्फ बच्चू संतापला. घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागला. एवढंच नाही तर त्यांच्या घरात घुसून त्याने त्याच्या बहिणीचा गळा आवळून तिला धमकावलं. 'मी तुला सुधारण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देत आहे, अन्यथा तुला मारून टाकीन मी संपूर्ण घराला स्मशानभूमी बनवीन.' अशी धमकी वीरेंद्रने दिल्याचं मनीषनं सांगितलं.
advertisement
फिर्यादी मनीषनं सांगितल्यानुसार, रस्त्यावर भटके कुत्रे फिरत असून ते दररोज लहान मुलांना चावतात. त्यामुळे त्यानं महापालिकेच्या पथकाच्या मदतीनं या कुत्र्यांना पकडलं. याचा राग आल्याने बच्चूने त्याला व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर हे कुटुंब घाबरलं आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
December 18, 2023 6:18 PM IST