12 वर्षांचा मुलगा क्लासला गेला परत आलाच नाही, पण पोलिसांनी अशी शक्कल लढवली आणि...
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
तो याच भागातून घरी जात असे. त्याचा कोचिंग क्लास ही याच भागात आहे. फुटेजमध्ये पोलिसांना मुलगा मराठाहळ्ळी बस स्टँडजवळ उभा असल्याचं दिसलं.
बंगळुरू : हरवलेली व्यक्ती शोधण्यासाठी अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्राधान्यानं वापर केला जातो. बऱ्याचवेळा ही गोष्ट यशस्वी झाल्याचं दिसतं. कर्नाटकात अशाच प्रकारची एक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियाच्या मदतीने पोलिसांनी हरवलेला 12 वर्षांचा मुलगा शोधून काढला.
कर्नाटकातील बंगळुरूत हरवलेला 12 वर्षांचा मुलगा शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. बेंगळुरूतील व्हाइटफिल्ड परिसरात 21 जानेवारीला परिणव हा मुलगा कोचिंग क्लाससाठी घराबाहेर पडला. पण घरी परतला नाही. यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने या मुलाचा शोध सुरू केला. परिणव हा इयत्ता सहावीत शिकतो. हरवलेल्या परिणव शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाची मदत घेतली. त्यात त्यांना यश देखील आलं आहे. परिणव सापडल्याने त्याच्या पालकांनी लोकांचे तसेच ज्या व्यक्तीने त्याचे फोटो व्हायरल केले आणि त्याच्याविषयी माहिती दिली त्याचेही आभार मानले.
advertisement
12 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुंजूर पोलीस स्टेशनच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. कारण तो याच भागातून घरी जात असे. त्याचा कोचिंग क्लास ही याच भागात आहे. फुटेजमध्ये पोलिसांना मुलगा मराठाहळ्ळी बस स्टँडजवळ उभा असल्याचं दिसलं. त्यानंतर तो रेल्वे स्टेशनमध्ये गेला आणि ट्रेनमध्ये बसला. पोलिसांनी सखोल तपास केला असता, त्याने कोचिंग क्लास ते मराठाहळ्ळीपर्यंत बसने प्रवास केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तो ट्रेनने म्हैसूरला पोहोचला. म्हैसूर रेल्वे स्टेशनहून तो चेन्नई रेल्वे स्टेशनवर गेला आणि शेवटी त्याने हैदराबादची ट्रेन पकडली.
advertisement
तपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाची देखील मदत घेतली. त्यांनी परिणवचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला, जेणेकरून एखाद्या व्यक्तीनं त्याला पाहिलं असेल तर तो त्या बाबत पोलिसांना माहिती देईल. मुलाचे पोस्टर जागोजागी लावले गेले. पोलिसांच्या कल्पनेला यश मिळालं. हैदराबादमध्ये एका व्यक्तीने या मुलाला नामपल्ली मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रोत पाहिलं आणि त्याची ओळख पटताच तातडीने पोलिसांना माहिती दिली.
advertisement
त्यानंतर नामपल्ली पोलिसांनी परिणवला त्यांच्याजवळ थांबवून घेतलं. सध्या बेंगळुरूतून पोलीस हैदराबादकडे रवाना झाले आहेत. या मुलाचं अपहरण झालं नसल्याचं सांगितलं जात आहे. तो स्वतः ट्रेनमध्ये बसला. त्याने असं का केलं हे त्याच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. पण सोशल मीडियाच्या मदतीने बेपत्ता मुलाला शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2024 9:34 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
12 वर्षांचा मुलगा क्लासला गेला परत आलाच नाही, पण पोलिसांनी अशी शक्कल लढवली आणि...







