आजही त्याच्या हातून चुकीचं घडलं तर...! आस्ताद काळेच्या त्या VIDEO वर वडील प्रमोद यांचा संताप
- Published by:Priya Lad
Last Updated:
Aastad Kale : नाटक सुरू असताना ते मधेच थांबवून अभिनेता आस्ताद काळे प्रेक्षकांवर भडकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आस्तादला ट्रोल केलं गेलं. आता यावर आस्तादचे वडील प्रमोद काळे यांनीही संताप व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेता आस्ताद काळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नाट्यगृहातील हा व्हिडीओ. ज्यात आस्ताद सविता दामोदर परांजपे हे नाटक करतो आहे. पण आस्ताद नाटक चालू असताना मधेच प्रेक्षकांवर भडकला, त्याने नाटक मधेच थांबवलं. आस्तादचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याला अनेकांनी ट्रोल केलं. आता त्याच्या या व्हिडीओवर त्याचे वडील प्रमोद काळे यांचीही प्रतिक्रिया आली आहे.
सविता दामोदार परांजपे हे नाटक सुरू असताना प्रेक्षकांमध्ये कोणाच्या तरी फोनवर बोलण्याचा आवाज आला. आवाज ऐकून आस्तादने नाटक अर्ध्यावर थांबवलं. तो स्टेजच्या पुढे आला आणि त्याने फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकाला चांगलंच झापलं. आस्ताद म्हणाला, "आम्ही तुमच्या बदली फोनवर येऊन बोलतो मग तुम्ही इथे येऊन आमचं नाटक करा". त्यानंतर तो त्याच्या जागेवर गेला आणि पुन्हा मागे वळला आणि त्याने हात जोडून नाटक मधेच थांबवल्याने सगळ्यांची माफी देखील मागितली. तरी अभिनेता ट्रोल झाला.
advertisement
दरम्यान आस्तादचे वडील प्रमोद यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. "मी प्रमोद काळे, आस्ताद काळेचा बाप. त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय आणि त्यावर अनेक प्रतिक्रियांचा पूर आलाय. त्यासंदर्भात ही मोठी पोस्ट", अशी त्यांनी पोस्टची सुरुवात केली आहे.
advertisement
प्रमोद काळे नेमकं काय म्हणाले, त्यांची संपूर्ण पोस्ट
प्रमोद काळेंनी आस्तादचा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांना झापलं
मुळात कोणा इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. कोणाच्या परवानगीने त्यांनी हे कृत्य केलं? ते काय संपूर्ण नाटक शूट करत होते? नेमका हा भाग कसा काय कोणी शूट केला? आणि मग ती जी कोणी व्यक्ती नाटक चालू असताना मोबाईलवर स्पीकर ऑन ठेवून मोठ्याने बोलत होती, त्याचं शूटिंग का नाही केलं? कलाकार काय सार्वजनिक मालमत्ता समजता का तुम्ही? इन्स्टाग्रामवर टाकण्याआधी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती? असा सवाल त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना विचारला.
advertisement
आस्तादला ट्रोल करणाऱ्यांना प्रेक्षकांनाही प्रमोद यांनी सुनावलं
आता ज्या महाभागांच्या अत्यंत शिवराळ आणि अनाहूत प्रतिक्रिया आल्या आहेत त्याच्याबद्दल. एक माननीय लिहितात 'हा फार माजूरडा आहे, स्वतःला काय नाना पाटेकर समजतो काय?' म्हणजे? नाना पाटेकर असं वागले असते तर चाललं असतं? आणि नशीब आस्ताद तसं काही समजत नाही! तिथे नाना असता तर त्याने त्या प्रेक्षकांच्या मुस्कटात लगावून तो मोबाईल फेकून दिला असता!
advertisement
आणखी एक दोघं म्हणतात तमाशा थिएटरात, झाडीपट्टीत हे सगळं चालतं, तर तिथले कलाकार कसं चालवून घेतात? ह्यांनाच काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक ठिकाणची एक संस्कृती, काही रीतभात असते. आता आश्विनी भिडे किंवा कौशिकी चक्रवर्ती कितीही शृंगारिक ठुमरी गात असतील तर तिथे कोणी श्रोता बोटं तोंडात घालून शिट्ट्या नाही मारत आणि झाडीपट्टीविषयी तर काय बोलणार! पण संस्कृती...
advertisement
हा माज नाही तर...
"ह्याला लई माज हाये अशी अनेकांची तक्रार आहे. याला माज नाही, स्वतःचा आणि स्वतःतल्या कलावंताचा अभिमान व कलेबद्दलची निष्ठा म्हणतात. माज असेल, तर तो त्या फोनवर बिनदिक्कत मोठ्याने बोलणाऱ्या व्यक्तीला. 500 रुपयांचं समजा तिकीट काढलं म्हणजे काय सगळं थिएटर, सगळे कलाकार विकत घेतले की काय? त्याच्या माजाबद्दल कोण बोलणार? आपण आसपासच्या आपल्याप्रमाणेच तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांचा रसभंग करत आहोत एवढीही समज नसावी? अशावेळी खरं तर इतर प्रेक्षकांनीच अशांना धडा शिकवला पाहिजे!पण आपण नको तेव्हा सहिष्णू गांधीवादी!"
advertisement
प्रेक्षकांना मायबाप म्हणून डोक्यावर चढवणाऱ्या कलाकारांचं पाप
"कित्येकांचं म्हणणं आहे, प्रेक्षक येतात म्हणून तुमची नाटकं चालतात, तुम्ही त्यांच्यामुळे पैसे कमावता.
हे त्या जुन्या काळातल्या प्रेक्षकांना मायबाप म्हणून डोक्यावर चढवणाऱ्या कलाकारांचं पाप आहे. इथे कोणीही प्रेक्षक नाट्य व्यवसाय चालावा, बिचाऱ्या नटनट्यांच्या घरच्या चुली पेटाव्या या महान उदार हेतूने नाटकाला येत नसतो. त्याचीही काही गरज असते म्हणून तो येतो. तेव्हा यातली ही उपकाराची भावना मूर्खपणाची, मध्ययुगीन सरंजामशाहीची आहे"
त्यांना काही वेळ तरी श्वास घेऊ द्याल की नाही?
"आणखी एक तक्रार म्हणजे, नाटक संपल्यावर मेकअप रूम्समध्ये फोटो काढायला आलेल्यांशी हा उद्धटपणे वागतो. बाबानो दोन अडीज तास एखादी गुंतागुंतीची भूमिका निभावून नेताना नट थकतात, भावनिक दृष्ट्याही ते दमतात. त्यांना काही वेळ तरी श्वास घेऊ द्याल की नाही? नाटक संपलं रे संपलं, की तुटून पडल्यासारखे येतात! आस्तादने कधीही, कोणालाही सोबत फोटो काढायला नकार दिल्याचं मी पाहिलेलं नाही. पण एखादे दिवशी प्रयोगानंतर तातडीने कुठे जायचं असू शकतं, काही इमर्जन्सी असू शकते हे ध्यानात घ्याल की नाही?"
"त्याची आई शेवटच्या आजारात मरणाशी झगडत असतानाही तो प्रयोगाला जात होता, कारण प्रयोग रद्द करण्याने अनेकांचं नुकसान होत असतं. द शो मस्ट गो ऑन! बरं, हे लोक कुठेही येतात सेल्फया काढायला! स्मशानापासून मंगल कार्यालयापर्यंत आणि मॉलपासून भर रस्त्यापर्यंत व्हाया रेस्टोरंट्स, मंडई इत्यादी!"
टीक करताना भान जागी ठेवा
"आणखी एक महत्त्वाची गोष्ट : तीनशे रुपये नाईट पासून आज पाच आकडी नाईटपर्यंत तो पोचलाय, ते त्याच्यातल्या सच्चा अभिनयाच्या जोरावरच. आस्तादला कोणी गॉड फादर, गॉड मदर नाही, आहे तो खणखणीत अभिनय, आणि आत्मविश्वास. त्याचं हे जग कोणाच्या कृपेवर चालत नाही. इथे प्रत्येक प्रयोगात स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. कमी पडलात, तर फेकले जाता तुम्ही दूर. तेव्हा टीका करताना अशी अनेक भानं जागी ठेवून ती करावी"
"आपल्याकडे कला, कलाकार यांना आदर द्यायचा असतो, ते समाजातले महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्यामुळे आपलं जगणं सुंदर होत असतं हे कोणी लहानपणी सांगतच नाही, आणि त्यातून या अशा निर्बुद्ध, उद्दाम प्रतिक्रिया येतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जी लहानपणापासून बिंबवली गेलीच पाहिजे, ती म्हणजे सामाजिक जबाबदारी! पण ते असो. आडातच नसेल, तर..."
आस्तादची पाठराखण करणाऱ्यांचे मानले आभार
"अस, पण या सगळ्यात कित्येकांनी आस्तादची पाठराखणही केली आहे, त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
त्याच्या सहव्यावसायिकांच्या खरं तर जोरदार प्रतिक्रिया यायला हव्यात, कारण हा काही कोणा एकट्याचा प्रश्न नव्हे. किंवा आल्याही असतील, किंवा येतीलही.... बघू!"
प्रमोद काळेंचा मुलगा आस्तादला पाठिंबा
"मला माझ्या मुलाचा आणि त्याच्यात असलेल्या कलागुणांचा प्रचंड आणि रास्त अभिमान आहे. रास्त यासाठी, की आजही त्याच्या हातून काही चुकीचं घडलं, तर मी त्याला दोष देतोच. पण हा जो व्हिडीओ व्हायरल झालाय, त्या घटनेबद्दल माझा आस्तादला पूर्ण पाठींबा आहे", असं म्हणत प्रमोद आस्तादच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 11:08 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आजही त्याच्या हातून चुकीचं घडलं तर...! आस्ताद काळेच्या त्या VIDEO वर वडील प्रमोद यांचा संताप










