10 कोटींची खंडणी अन् मराठी अभिनेत्रीची सून, अटकेच्या 6 दिवसांनी कोर्टातून मोठी अपडेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून 10 कोटींच्या खंडणीत गोत्यात आली होती. तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अटकेच्या 6 दिवसांनी कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे.
2025 हे वर्ष संपत असतानाच मराठी मनोरंजन विश्वाला हादरवणारी घटना समोर आली. प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला तब्बल 10 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. या बातमीनं मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. आई कुठे काय करते मालिकेतील कांचन आजी म्हणजे अभिनेत्री अर्चना पाटकर यांची एक्स सून हेमतला पाटकर उर्फ बाणे खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात अटकेनंतर जवळपास सहा दिवसांनी कोर्टाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.
हेमलता बाणे आणि तिची मैत्रीण अमरिना झवेरी उर्फ फर्नांडिस यांना 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेच्या सहा दिवसांनी दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. 37 वे महानगर दंडाधिकारी विनोद पाटील यांनी दोन्ही आरोपी महिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. या दोघींना भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308 आणि 61 अंतर्गत खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना या अटक खोट्या आरोपांवर आधारित असल्याचा दावा केला.
advertisement
ही संपूर्ण केस एका गंभीर मारहाणीच्या घटनेतून पुढे आली आहे. मागील महिन्यात गोरेगाव परिसरात एका लिफ्टमध्ये अमरिना झवेरी हिच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीत अमरिना गर्भवती असल्याने तिचा गर्भपात झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रिदम गोयल या तरुणाला अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला होता. मात्र अमरिनाने हस्तक्षेप अर्ज दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तो जामीन रद्द केला.
advertisement
यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले. व्यावसायिक अरविंद गोयल यांनी तक्रार दाखल करत आरोप केला की, त्यांच्या मुलाच्या जामीनाला विरोध न करण्याच्या बदल्यात हेमलता बाणे आणि अमरिना झवेरी यांनी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. या आरोपांनंतर शहर पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलने दोघींनाही अटक केली.
तक्रारीनुसार अभिनेत्री हेमलता बाणे हिने स्वतःला अमरिनाची नातेवाईक असल्याचे सांगत तक्रारदाराशी संपर्क साधला होता. प्रकरण 'सेटल' करण्याची ऑफर दिली होती. साक्षीदार फिरतील आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनाला विरोध केला जाणार नाही असं सांगून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
advertisement
अमरिनाने दाखल केलेल्या FIRमध्ये 15 नोव्हेंबर रोजी लिफ्टमध्ये झालेल्या घटनेचे सविस्तर वर्णन आहे. रिदम गोयल आणि त्याच्या मित्रांनी दारूच्या नशेत शिवीगाळ, मारहाण केली आणि गर्भवती असल्याचे सांगूनही पोटावर मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 10:23 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
10 कोटींची खंडणी अन् मराठी अभिनेत्रीची सून, अटकेच्या 6 दिवसांनी कोर्टातून मोठी अपडेट










