Sachin Pilgaonkar : गब्बरवरून महाराष्ट्रात 'शोले', महागुरूंच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी शोले चित्रपटामधील गब्बर सिंगची भूमिका बजावलेल्या अमजद खान यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. शोले चित्रपटाच्या वेळी आपण अमजद खान यांना डायलॉग डिलिव्हरी शिकवल्याचं सचिन पिळगावकर म्हणाले होते, यावरून सचिन पिळगावकर ट्रोलर्सच्या निशाण्यावरही आले.
सचिन पिळगावकर यांच्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करून सचिन पिळगावकर यांचा हा दावा पचनी पडत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
'डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल. गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की, गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील १९५०-६० च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत आज ही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंग ला विसरूच शकत नाही', असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
advertisement
शोले हा सिनेमा १९७५ साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक - एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता.
डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा… pic.twitter.com/5YijSDxCja
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 21, 2025
advertisement
काय म्हणाले होते सचिन पिळगावकर?
'शोलेच्या वेळी अनेकांना अमजदचा आवाज गब्बरचा आवाज वाटत नव्हता, त्याचा आवाज पातळ वाटत होता. अमजदला मी माईकसमोर उभं केलं, आणि आमचे सूद नावाचे रेकॉर्डिस्ट होते, त्यांना ट्रेबल बंद करून बेस वाढवायला सांगितला. यानंतर मी अमजदला माईकच्या जवळ उभं राहायला सांगितलं आणि वरच्या पट्टीत नाही, खालच्या पट्टीत बोल. माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता. अमजदने पहिला डायलॉग कितने आमदी थे... हे वरच्या पट्टीत म्हटला, पण मी त्याला सांगितलं, खालच्या पट्टीमध्ये बोल. मी गायकही आहे, त्यामुळे मला कळतं, त्यामुळे मी त्याला कितने आदमी थे, हे खालच्या सुरात बोलायला सांगितलं', असं सचिन पिळगावकर म्हणाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2025 11:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar : गब्बरवरून महाराष्ट्रात 'शोले', महागुरूंच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार