Manache Shlok : वाद-विवादांना पूर्णविराम! 'मनाचे श्लोक' चित्रपट आता नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला, कधी होणार रिलीज?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने हिरवा कंदील दाखवूनही काही संघटनांनी प्रदर्शनात अडथळे आणल्याने निर्मात्यांनी अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे. 'मनाचे श्लोक' या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून त्याच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शीर्षकावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट आता नव्या नावाने, नव्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने हिरवा कंदील दाखवूनही काही संघटनांनी प्रदर्शनात अडथळे आणल्याने निर्मात्यांनी अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे. मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून त्याच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे.
प्रेक्षकांसाठी मोठा निर्णय
या चित्रपटाचे मूळ शीर्षक 'मनाचे श्लोक' होते. या शीर्षकामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आक्षेप घेत काही संस्थांनी चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण गोंधळामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच सार्वजनिक मालमत्ता किंवा चित्रपटगृहांचे नुकसान टाळता यावे, यासाठी निर्मात्यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हा चित्रपट येत्या गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी 'तू बोल ना' या नावाने चित्रपटगृहांत दाखल होत आहे.
advertisement
निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी सांगितले, "गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते. परंतु, रसिक प्रेक्षक, समाजमाध्यमे आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीने आम्हाला अभूतपूर्व पाठिंबा दिला. हे पाठबळ आमच्यासाठी खूप मोलाचे होते."
advertisement
या पाठिंब्यामुळेच नव्या नावाने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्मात्यांना खात्री आहे की, आता प्रेक्षकांना हा सामाजिक विचारांवर आधारित चित्रपट कोणत्याही अडथळ्याशिवाय सुविहितपणे पाहता येईल.

मराठी चित्रपटसृष्टीतील तरुणांची तगडी फळी
'तू बोल ना' या चित्रपटात आजच्या मराठी चित्रपटसृष्टीतील तरुणांची एक तगडी फळी आहे. यात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे प्रमुख भूमिकेत दिसतील. तसेच, लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर यांसारखे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. अनेक अडथळ्यांवर मात करून प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Manache Shlok : वाद-विवादांना पूर्णविराम! 'मनाचे श्लोक' चित्रपट आता नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला, कधी होणार रिलीज?