'प्रायव्हसी आणि डिग्नीटी...', लैंगिक अत्याचार प्रकरणी संगीतकार अडचणीत; पीडितेच्या वकिलांनी जारी केले निवेदन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sachin Sanghvi Controversy : २० वर्षीय महिलेच्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपावरून सचिन सांघवी यांना अटक करण्यात आली होती आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. आता या प्रकरणावर पीडित महिलेच्या वकिलांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या संगीताने धुमाकूळ घालणारे आणि 'स्त्री २', 'भेडिया' सारख्या चित्रपटांना हिट गाणी देणारे संगीतकार सचिन सांघवी सध्या एका गंभीर कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. एका २० वर्षीय महिलेच्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. आता या संपूर्ण प्रकरणावर पीडित महिलेचे वकील निशांत जौहरी यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.
लग्नाचे आश्वासन आणि शोषणाचे आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सांघवी यांनी एका महिलेला आपल्या म्युझिक अल्बममध्ये संधी देण्याचे आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन कथितरित्या तिचे शोषण केले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये सचिन सांघवी यांनी तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि त्यानंतर कामाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.
advertisement
पीडितेने तक्रारीत आरोप केला आहे की, सांघवी यांनी तिला त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलावले. तिथे त्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि अनेक वेळा तिचे यौन शोषण केले. सचिन सांघवी हे 'सचिन-जिगर' या लोकप्रिय संगीतकार जोडीचे सदस्य आहेत.
"न्यायासाठी प्रत्येक मार्ग अवलंबणार!"
सचिन सांघवी यांना जामीन मिळाल्यानंतर आता पीडितेच्या वतीने वकील निशांत जौहरी यांनी निवेदन जारी केले आहे. त्यांनी कायदेशीर जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मार्ग अवलंबण्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. जौहरी म्हणाले, "आम्ही आमच्या क्लायंटला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक कायदेशीर पाऊल उचलण्यास तयार आहोत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे आम्ही यावर अधिक भाष्य करणार नाही."
advertisement
मीडियाला संयम राखण्याचे आवाहन
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वकिलांनी मीडियाला या प्रकरणाचे वार्तांकन करताना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, "मीडियाला आमचे नम्र आवाहन आहे की, त्यांनी पीडितेची प्रतिष्ठा आणि गोपनीयता जपून अत्यंत संवेदनशील पद्धतीने या प्रकरणाचे रिपोर्टिंग करावे. या प्रकरणाला सनसनाटी बनवण्याचे टाळावे."
दुसरीकडे, सचिन सांघवी यांचे वकील आदित्य मिठे यांनी मात्र हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगत तक्रारीचे खंडन केले आहे. सध्या या गंभीर प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'प्रायव्हसी आणि डिग्नीटी...', लैंगिक अत्याचार प्रकरणी संगीतकार अडचणीत; पीडितेच्या वकिलांनी जारी केले निवेदन


