Kalyan News : दुर्दैवी! इमारतीच्या 4 थ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य समोर
Last Updated:
Construction Accident : कोनगाव येथील बांधकाम साईटवर चौथ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. मजुरांना सुरक्षा साधने न दिल्यामुळे हा अपघात घडल्याचे तपासात उघड झाले असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण : कल्याणजवळील कोनगाव परिसरात सुरू असलेल्या इमारत बांधकामात काम करत असलेल्या तरुण मजुराचा चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सिकंदर जियालाल यादव (वय 19) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना 6 जानेवारी रोजी घडली असून घटनेच्या सुमारे 15 दिवसांनंतर झालेल्या चौकशीनंतर संबंधित लेबर कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिल्डिंगच्या 4 थ्या मजल्यावरून मजूर कोसळला
कोनगाव परिसरातील अटलांटिका नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी सिकंदर यादव मजुरीचे काम करत होता. चौथ्या मजल्यावर काम करत असताना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो इमारतीच्या लिफ्टसाठी असलेल्या डकमध्ये पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत्यूमागे 'हे' धक्कादायक कारण
या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांना आवश्यक असलेली कोणतीही सुरक्षा साधने पुरवण्यात आलेली नव्हती, असे स्पष्ट झाले. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जाळी किंवा इतर सुरक्षा सुविधा न दिल्यामुळे हा अपघात घडल्याचे तपासात समोर आले आहे.
advertisement
या निष्काळजीपणामुळे सिकंदर यादव याचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत, लेबर कॉन्ट्रॅक्टर कुनाल अमरीशभाई बोरनिया आणि रमेश शंकर पवार यांच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सिकंदरचे वडील जयलाल सनीलाल यादव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पुढील तपास कोनगाव पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 9:13 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : दुर्दैवी! इमारतीच्या 4 थ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य समोर










