Kalyan-Shil highway : लक्ष द्या! कल्याण-शिळ महामार्गावरील प्रवास बदला; 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान 'असे' असतील वाहतुकीचे नियम
Last Updated:
Kalyan-Shil Road : कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बांधणी लवकरच सुरू होत आहे. यामुळे वाहतुकीत मोठे बदल केले जातील. प्रवाशांनी नवीन पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कल्याण : कल्याण- शिळ महामार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून त्यानुसार पुढचे नियोजन करावे. येत्या काही दिवसात शिळ महामार्गावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाची नव्याने बांधणी करण्यात येणार असून त्यामुळे वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलेला आहे. चला तर सविस्तर जाणून घ्या वाहनचालकांनी कोणत्या मार्गाचा वापर करावा.
'या' दिवशी वाहतूकीत असणार बदल
दिल्ली ते जेएनपीटी या डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पात सीटीपी 11 या उपप्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. त्यातही कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने डीएफसीसीच्या डबल कंटेनर मालवाहू ट्रॅफिकला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे जुना उड्डाणपूल तोडून त्याची नव्याने बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या कामाची जबाबदारी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडे आहे आणि रेल्वे प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
advertisement
हे काम कल्याण-शिळ महामार्गावरील लोढा पलावा जवळ, एक्सपिरिया मॉलच्या बाजूने होणार असून या भागातील निळजे पुलाची उंची कमी असल्याने त्याचे पुर्ननिर्माण आवश्यक झाले आहे. कामाचा कालावधी तीन दिवस आहे आणि तो 7 नोव्हेंबर मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होऊन 9 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या निर्देशानुसार वाहतूक नियंत्रण विभागाने तात्पुरत्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने या कामासाठी वाहतुकीत बदल राबवले आहेत.
advertisement
वाहतुकीतील बदल पाहा
प्रवेश बंद 1- कल्याणकडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना निळजे कमानीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना निळजे कमानीजवळून उजवीकडे वळून लोढा पलावाच्या मार्गावरून महालक्ष्मी हॉटेलजवळून इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय दिला आहे.
प्रवेश बंद 2- लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन आणि एक्सपिरिया मॉलकडून कल्याणकडे जाणाऱ्या वाहनांना निळजे पुलाच्या चढणीवरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना कल्याण-शिळ महामार्गाने शिळफाटा, देसाई खाडीपूल आणि सरस्वती टेक्सटाईलजवळून उजवीकडे वळण घेऊन नवीन पलावा उड्डाणपूलावरून इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग दिला आहे.
advertisement
प्रवेश बंद 3- मुंब्रा आणि कल्याण फाट्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या जड/अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून या वाहनांना कल्याण फाटा-शिळफाटा-मुंब्रा बायपास-खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जाण्याची सोय करण्यात आली आहे.
प्रवेश बंद 4- कल्याणकडून मुंब्रा/कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या चाकी आणि जड/अवजड वाहनांना काटई चौक येथे प्रवेश बंद आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना काटई चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाण्याची सोय आहे.
advertisement
प्रवेश बंद 5- तळोजा एमआयडीसी मार्गे नवी मुंबईतील खोणी नाका आणि निसर्ग हॉटेलकडून काटई/बदलापूर चौकाकडे येणाऱ्या जड/अवजड वाहनांना निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना निसर्ग हॉटेल जवळून उजवीकडे वळून काटई/बदलापूर पाईपलाइन मार्गे इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग दिला आहे.
प्रवेश बंद 6- अबरनाथ आणि बदलापूरकडून काटई-बदलापूर पाईपलाइन मार्गे काटई चौकाकडे येणाऱ्या जड आणिअवजड वाहनांना निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना डावीकडे वळून तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
या तात्पुरत्या वाहतूक बदलांमुळे प्रवाशांना आणि मालवाहू वाहतूक करणाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग मिळतील तसेच डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पाचे काम वेळेत पार पडेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 2:21 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan-Shil highway : लक्ष द्या! कल्याण-शिळ महामार्गावरील प्रवास बदला; 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान 'असे' असतील वाहतुकीचे नियम


