अंगणवाडीची आरोग्य तपासणी अन् स्वराला मिळाला आवाज, जन्मत: मूकबधिर चिमुकली आता बोलणार!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Beed News: जन्मत: मूकबधिर असणाऱ्या बीडच्या चिमुकलीला अंगणवाडीच्या आरोग्य तपासणीमुळं नवं जीवन मिळणार आहे. तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे.
बीड: अंगणवाडीची आरोग्य तपासणी आणि अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जन्मत: मुकबधिर मुलीला नवं जीवन मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील आरणविहारा गावातील स्वरा शिरसाठ ही अनेक वर्षे आवाज नसलेल्या अवस्थेत वाढत होती; परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या मदतीने तिच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण वळण आले. अंदाजे सहा लाख रुपये खर्च असलेली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात पूर्णपणे मोफत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
स्वराचा आजार प्रथम अंगणवाडी आरोग्य तपासणीदरम्यान आढळून आला. आष्टी येथील आरबीएसकेची टीम क्रमांक ०२ – डॉ. प्रदीप अकोलकर, डॉ. ज्योती मोरे आणि फार्मासिस्ट कोठुळे यांनी तपासणीदरम्यान तिच्या ऐकण्याच्या क्षमतेत गंभीर त्रुटी असल्याची नोंद केली. तत्काळ आवश्यक तपासण्या करण्यासाठी ती बीड जिल्हा रुग्णालयातील डीईआयसी विभागाकडे पाठवण्यात आली. येथे बेरा टेस्ट घेण्यात आली आणि तिच्या मूकबधिरत्वाचे निदान निश्चित झाले.
advertisement
निदान झाल्यानंतर स्वरा शिरसाठ हिला उपचारासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रियेची निवड करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या उपचार प्रक्रियेची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुसज्जता आणि तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था वेळेत करण्यात आली. या प्रक्रियेत डॉ. एल. आर. तांदळे, रमेश तांगडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. भांगे आणि आष्टीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुट्टे यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
advertisement
अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात स्वरावर विशेष तज्ज्ञांच्या टीमने शस्त्रक्रिया केली. ही प्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि खर्चिक असल्याने, पालकांसाठी ती पार पाडणे शक्य नव्हते. मात्र सरकारी योजनांच्या मदतीने पूर्ण खर्च उचलण्यात आला. उपचारादरम्यान आवश्यक सर्व चाचण्या, उपकरणे आणि औषधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी, जीव वाचवण्यासोबतच आर्थिक भार टाळण्यात यश आले.
advertisement
स्वरा आता बोलणार
view commentsस्वराची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुढील पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या ती श्रवण आणि वाणी प्रशिक्षण घेत असून तज्ज्ञांच्या मदतीने संवाद शिकत आहे. या यशस्वी उपचारामुळे तिच्या कुटुंबाला दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील अनेक कुटुंबांसाठी हा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. सरकारी आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील बालकांनाही आधुनिक वैद्यकीय उपचारांची संधी मिळू शकते, हे स्वराच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
November 20, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
अंगणवाडीची आरोग्य तपासणी अन् स्वराला मिळाला आवाज, जन्मत: मूकबधिर चिमुकली आता बोलणार!


