'बॉडी' बनवण्याच्या नादात जीवावर बेतलं; प्रोटीन शेक घेण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा; नाहीतर होईल पश्चात्ताप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नुकतीच उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एका 19 वर्षांच्या मुलाचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शेक प्यायल्यानंतर त्याचे फुफ्फुस निकामी झाले आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा जीव गेला. ही घटना आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
मुंबई : आजकालच्या तरुणाईमध्ये 'पिळदार शरीर' आणि 'सिक्स पॅक ॲब्स'ची मोठी क्रेझ आहे. जिम जॉइन केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रिझल्ट दिसावा यासाठी अनेकजण प्रोटीन शेक (Protein Shake) आणि सप्लिमेंट्सचा आधार घेतात. पण, हाच प्रोटीन शेक कधीकधी जीवावर बेतू शकतो. उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एका 19 वर्षांच्या मुलाचा प्रोटीन शेक प्यायल्यानंतर झालेला मृत्यू ही एक धोक्याची घंटा आहे. शेक प्यायल्यानंतर त्याच्या फुफ्फुसांनी काम करणे थांबवले आणि शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याने त्याचा अंत झाला.
जर तुम्हीही जिम लावली असेल किंवा प्रोटीन घेण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
प्रोटीन सप्लिमेंट्स: आपण नक्की काय पितोय?
जिममध्ये गेल्यानंतर कोच किंवा मित्रांच्या सांगण्यावरून आपण डबेच्या डबे प्रोटीन सप्लिमेंट्स विकत घेतो. पण, भारतातील एका संशोधनानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या 70% प्रोटीन सप्लिमेंट्सवरील माहिती ही दिशाभूल करणारी आहे. इतकेच नाही तर 14% सप्लिमेंट्समध्ये घातक टॉक्सिन्स (विषारी घटक) आढळले आहेत. आपल्या शरीराला प्रोटिनची गरज असते पण आर्टिफिशल प्रोटिन शेकची नाही, त्यामुळे शक्य तितकं नॅचरल प्रोटीन घ्या, ते ही तुमच्या शरीराला जितकं गरजेचं आहे तितकच, त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन नको.
advertisement
प्रोटीन का महत्त्वाचं आहे?
आपले शरीर 60% पाणी, 16% प्रोटीन आणि 16% फॅटपासून बनलेले असते. प्रोटीन हे स्नायूंच्या बांधणीसाठी, केसांसाठी, नखांसाठी आणि शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनासाठी 'बिल्डिंग ब्लॉक' म्हणून काम करते. मात्र, हे प्रोटीन नैसर्गिक अन्नातून मिळवणे सर्वात सुरक्षित असते.
जिम करणाऱ्यांनी किती प्रोटीन घ्यावे?
सामान्य व्यक्ती: शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ग्रॅम प्रोटीन.
advertisement
जिम करणारे/ॲथलीट्स: शरीराच्या वजनाच्या 1 ते 1.2 ग्रॅम प्रति किलो प्रोटीन. (उदा. जर तुमचे वजन 70 किलो असेल, तर तुम्हाला दिवसाला साधारण 70 ते 84 ग्रॅम प्रोटीनची गरज असते.)
प्रोटीन शेक पिताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका:
१. फायबरचे महत्त्व: केवळ प्रोटीन घेऊन चालत नाही. प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला फायबर (Fiber) ची अत्यंत गरज असते. जर तुम्ही प्रोटीनसोबत भाज्या किंवा फळे खाल्ली नाहीत, तर बद्धकोष्ठता, गॅस आणि पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
advertisement
२. पाण्याचे प्रमाण: जास्त प्रोटीन घेतल्याने किडनीवर ताण येतो. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, अन्यथा डिहायड्रेशनचा धोका असतो.
३. डॉक्टरांचा सल्ला: प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. स्वतःच्या मनाने किंवा जिम ट्रेनरच्या आग्रहाखातर सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी रक्ततपासणी करून डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
नैसर्गिक पर्याय निवडा
जर तुम्हाला शक्य असेल, तर अंडी, पनीर, सोयाबीन, डाळी, बदाम आणि चिकन यांसारख्या नैसर्गिक स्रोतांतून प्रोटीन मिळवण्याचा प्रयत्न करा. हे प्रोटीन शरीर नैसर्गिकरित्या शोषून घेते आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात.
advertisement
फिट राहणे ही शरीराची गरज आहे, पण केवळ दिसण्यासाठी आरोग्याशी खेळणे चुकीचे आहे. लक्षात ठेवा, नैसर्गिक आहार हा सप्लिमेंटपेक्षा केव्हाही चांगला असतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 6:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'बॉडी' बनवण्याच्या नादात जीवावर बेतलं; प्रोटीन शेक घेण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा; नाहीतर होईल पश्चात्ताप










