होळीच्या दिवशी घरीच बनवा चटपटीत दही भल्ला, पाहा साधी सोपी रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
होळीचा सण म्हटलं की आपल्याला आठवते पहिले पुरण पोळी. मात्र होळीसाठी तुम्ही घरच्या दही भल्लाही सोप्या पद्धतीनं बनवू शकता.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई : होळीचा सण म्हटलं की आपल्याला आठवते पहिले पुरण पोळी. कारण शक्यतो सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी ही असतेच. पण तुम्हाला माहितीये का? की महाराष्ट्रात जशी पुरणपोळी बनवली जाते तसचं उत्तरेकडे म्हणजे उत्तर भारतात होळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी दही भल्ला बनवला जातो. महाराष्ट्रात दही भल्ल्याला दही वडा आपण म्हणतो. या दिवशी तशा बऱ्याच प्रकारच्या डिशेस बनवल्या जातात. पण बहुतेक घरांमध्ये दही भल्ला बनवला जातो. अनेकांना दही भल्ला विकत आणण्यापेक्षा तो घरी बनवणे आवडते. पण रेसिपी थोडीशी अवघडही वाटते. आणि तो बनवलाच तर तो कडक होण्याची भिती असते. पण मऊ आणि झटपट होणारा आणि अगदी तोंडात ठेवताच विरघळेल असा दही भल्ला सोप्या-साध्या पद्धतीनं कसा बनवला जाऊ शकतो? याची रेसिपी मुंबईतील राकेश गायकवाड यांनी सांगितली आहे.
advertisement
दही भल्ला बनवण्यासाठी लागणारं साहित्य
धुतलेली उडीद डाळ ( तुम्हाला किती दहीभल्ले बनवायचे आहे त्यानुसार डाळ घेणे) मूग डाळ ( मूग डाळीचं प्रमाण कमीच ठेवायचं) मीठ - 1 टीस्पून, काळे मीठ - अर्धा टीस्पून हिंग - चिमूटभर, ताजे दही, साखर - 2 टीस्पून, चिंच-गुळाची लाल चटणी, मिरची-कोथिंबीरीची हिरवी चटणी हे साहित्य लागेल.
advertisement
दही भल्ला बनवण्यासाठी कृती
दोन्ही डाळी धुवून त्या तीन ते चार तास भिजत ठेवायच्या. त्यानंतर सर्व पाणी नीट काढून डाळ मिक्सरमध्ये टाकून 3-4 चमचे पाणी घालून बारीक करून घ्यायचं. आता डाळ एका भांड्यात घेऊन चांगली फेटून घ्यायची. आता त्यात 1 चमचा साध मीठ आणि काळ मीठ मिक्स करायचं. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेऊन तोपर्यंत दही भल्लासाठी लागणार थंड पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं. या पाण्यात चिमूटभर हिंग मिक्स करायच. पिठाचे हलके गोळे करून ते तेलात सोडावे. मंद किंवा मध्यम आचेवर सर्व भल्ले हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळायचे आहेत. मोठ्या आचेवर जर तळले तर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते.
advertisement
एका प्लेटमध्ये सर्व भल्ले काढून ते भांड्यातील हिंग मिक्स केलेल्या थंड पाण्यात टाकावे. त्यानंतर दह्यात साखर, काळे मीठ एकत्र करून फेटून घ्याव. आता दही भल्ला पाण्यातून पिळून प्लेटमध्ये ठेवावा. त्यावर फेटलेलं दही, हिरवी आणि लाल आंबट चटणी घालावी आणि चिमूटभर काळे मीठ किंवा चाट मसाला वरून घालावा. चमचमीत असा दही भल्ला सर्व्ह करावा, असं राकेश गायकवाड सांगतात.
advertisement
तर अशा पद्धतीनं चटपटीत दही भल्ला अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं बनवला तरी तो तितकाच चविष्ट लागतो. त्यामुळे यंदा पुरणपोळी सोबत हा चटपटीत मऊ असा दही भल्ला नक्की ट्राय करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 21, 2024 1:52 PM IST