शरीरावर टॅटू बनवण्याची आवड ठरू शकते जीवघेणी! 'या' गंभीर आजाराचा वाढू शकतो धोका
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
फॅशन स्टेटमेंट मानलं जातं; मात्र टॅटू काढण्याची सवय घातकही ठरू शकते. गेल्या काही दिवसांत झालेल्या अभ्यासात हे स्पष्ट झालंय. टॅटूमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते.
शरीराच्या विविध भागांवर टॅटू काढणं अनेकांना आवडतं. ते फॅशन स्टेटमेंट मानलं जातं; मात्र टॅटू काढण्याची सवय घातकही ठरू शकते. गेल्या काही दिवसांत झालेल्या अभ्यासात हे स्पष्ट झालंय. टॅटूमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते.
काही वर्षांपूर्वी अमेरिका, युरोपमध्ये टॅटू काढण्याचा ट्रेंड होता. आता तो भारतातही पसरला आहे. शरीराच्या विविध अवयवांवर विविध प्रकारचे टॅटू काढण्याची क्रेझ लोकांमध्ये वाढते आहे. श्रावण महिन्यात टॅटू काढणाऱ्यांची संख्या वाढते. हे टॅटू छान दिसतात, ट्रेंडी वाटतात; मात्र आरोग्यासाठी ते हानिकारक असतात. टॅटूमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याबाबत निरीक्षणं नोंदवण्यात आली. टॅटूमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं, असं या संशोधनात म्हटलंय.
advertisement
हार्वर्ड हेल्थनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, टॅटू गोंदवून घेणाऱ्यांमध्ये लिम्फोमा नावाच्या ब्लड कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते, असा दावा नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात करण्यात आलाय. टॅटू काढून घेतल्यामुळे तुमच्या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये कॅन्सरचा धोका 21 टक्के वाढतो. स्वीडनच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला होता. यात 11,905 जणांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं होतं. खरं तर टॅटू व कॅन्सर यातला संबंध आधीही उघड झाला आहे. टॅटूसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमुळे शरीरात गंभीर आजार होऊ शकतात, असं याआधीच्या काही अभ्यासांमध्ये समोर आलं होतं.
advertisement
टॅटूची शाई शरीरावर जेव्हा सोडली जाते, तेव्हा शरीर त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती सक्रिय करते. त्या शाईचा एक मोठा भाग त्वचेपासून आत खोलवर असलेल्या लिम्फ नोड्समध्ये नेला जातो. तिथे तो जमा होतो; मात्र त्याचे परिणाम घातक असतात असं या अभ्यासातल्या संशोधकांचं म्हणणं आहे. डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा हा वेगानं पसरणारा कॅन्सर असतो, तो पांढऱ्या रक्तपेशींमध्ये निर्माण होतो. लिम्फोमा हा दुर्मीळ आजार असून त्यात रुग्णाचा जीव जाऊ शकतो.
advertisement
अमेरिकेतल्या जवळपास 30 टक्के प्रौढांच्या शरीरावर टॅटू काढलेले आहेत. गेल्या 20 वर्षांत टॅटूप्रेमींची संख्या वेगानं वाढली आहे. काही जण शरीरावर एखाद-दुसरा टॅटू काढून घेतात, तर काही जण शरीरावर प्रत्येक ठिकाणी टॅटू काढतात. भारतातही हा ट्रेंड आता वाढतोय. स्त्रिया व पुरुष दोघंही टॅटू काढून घेण्यात अग्रेसर असतात. टॅटूसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये घातक रसायनं असतात. त्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणून टॅटू काढणं बंद केलं पाहिजे, असं आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी टॅटूचा छंद थोडा बाजूला ठेवला पाहिजे. विशेषतः तरुणांनी याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2024 9:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शरीरावर टॅटू बनवण्याची आवड ठरू शकते जीवघेणी! 'या' गंभीर आजाराचा वाढू शकतो धोका