खूशखबर! माथेरानच्या मिनी ट्रेनला मिळाला मुहूर्त, आजपासून सेवा पुन्हा सुरू
- Reported by:Priyanka Jagtap
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Matheran Mini Train: नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा ही माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असतं. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात 10 जूनला ही सेवा बंद करण्यात आली होती.
मुंबई: महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या माथेरान येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. नेरळ ते माथेरान धावणारी मिनी ट्रेन हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. यंदा पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने जूनमध्ये रेल्वेने ही सेवा बंद केली होती. त्यानंतर ही सेवा कधी सुरू होणार याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता होती. आता ही मिनी ट्रेन सेवा आजपासून (6 नोव्हेंबर) पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना या मिनी ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा ही माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असतं. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात 10 जूनला ही सेवा बंद करण्यात आली होती. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही सेवा पूर्ववत होणं अपेक्षित होतं. परंतु, काही बोगी आणि इंजिनच्या दुरुस्ती कामांमुळे ही सेवा पूर्ववत होण्यास विलंब झाला. पर्यटकांकडून या सेवेबाबत सातत्याने विचारणा होत होती. आता या मिनी ट्रेन सेवेला मुहूर्त मिळाला असून 6 नोव्हेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे.
advertisement
दरम्यान, माथेरानच्या या सेवेसाठी आगाऊ बुकिंग नसल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या सर्व गाड्या 6 डब्यांच्या आहेत. यामध्ये 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी व एक लगेज व्हॅन असणार आहे. या ट्रेनच्या रोज अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी दोन दोन सेवा चालविण्यात येणार आहेत.तर पर्यटकांची गर्दी लक्षात घेता शनिवारी आणि रविवारी दोन दोन अतिरिक्त सेवा चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेनं सांगितलं आहे.
advertisement
मिनी ट्रेनचे वेळापत्रक
नेरळ माथेरान डाऊन मार्गावर नेरळहून सकाळी 8.50 आणि 10.24 वाजता ट्रेन सुटणार आहे. तर माथेरान नेरळ मार्गावर माथेरानहून दुपारी 2.45 आणि 4 वाजता गाडी सुटेल. तर माथेरानहून सकाळी 8.20, 9.10, 11.35 आणि दुपारी 2.00, 3.15, 5.20 या काळात माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहणार आहे. तर अमन लॉजहून सकाळी 8.45, 9.35 आणि दुपारी 12.00, 2.25, 3.40, 5.45 या वेळेत माथेरानसाठी शटल सेवा सुरू राहील.
advertisement
शनिवार आणि रविवारी विशेष अतिरिक्त सेवा
माथेरान वरून सकाळी 10.05 आणि दुपारी 01.10 वाजता शनिवार आणि रविवारी अतिरिक्त सेवा असणार आहेत. तर अमन लॉजवरून वरून सकाळी 10.30 आणि दुपारी 1.35 वाजता ही सेवा असेल. यासाठी अमन लॉज ते माथेरान तिकीट दर प्रथम श्रेणीसाठी 95 रुपये आणि द्वितीय श्रेणीसाठी 55 रुपये असणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 06, 2024 11:36 AM IST









