पंढरीची वारी..! कार्तिकी एकादशीनिमित्त धावणार विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीला संपूर्ण राज्यातून भाविक पंढरीत येत असतात. यासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत.
सोलापूर: कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. यात रेल्वेने येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. याच पंढरीच्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी 3 विशेष अनारक्षित गाड्या चालवण्यात येणार आहेत. 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत या गाड्या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे चालवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
लातूर-पंढरपूर-लातूर अतिरिक्त फेऱ्या
लातूर-पंढरपूर-लातूर या विशेष गाडीच्या 4 फेऱ्या होणार आहेत. 12 व 13 नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून ही विशेष गाडी सकाळी 7.30 सुटणार आहे. तर पंढरपूर-लातूर ही विशेष ट्रेन 12 व 13 नोव्हेंबर 2024 रोजी पंढरपूर स्थानकावरून दुपारी 1.50 वाजता सुटणार असून, लातूर रेल्वे स्थानकांवर सायंकाळी 7.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला हरंगूळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंदरी, कुर्डवाडी जं., मोडनिंब येथे थांबा देण्यात आला आहे.
advertisement
मिरजहून जाणाऱ्या भाविकांची सोय
मिरज-पंढरपूर-मिरज विशेष गाडीच्या एकूण 10 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी 10 ते 14 नोव्हेंबर दरम्यान पहाटे 5 वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून सुटणार असून, सकाळी 7.40 वाजता पंढरपूर रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. पंढरपूर-मिरज ही गाडी 10 ते 14 नोव्हेंबर या काळात पंढरपूर रेल्वेस्थानकावरून सकाळी 9.50 वाजता सुटणार असून, मिरज रेल्वेस्थानकावर दुपारी 1.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला आरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जतरोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला येथे थांबा देण्यात येणार आहे.
advertisement
मिरज-कुर्डूवाडी एक्स्प्रेसच्या 10 फेऱ्या
मिरज-कुडूवाडी ही ट्रेन 10 ते 14 नोव्हेंबर दरम्यान मिरज स्थानकावरून दुपारी 3.10 वाजता सुटणार असून पंढरपूर स्थानकावर 5.30 वाजता पोहोचणार आहे. पुढे कुर्डूवाडी स्थानकावर सायंकाळी 7 वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर कुर्डूवाडी स्थानकावरून रात्री 9.25 वाजता सुटणार असून, पंढरपूर रेल्वेस्थानकावर 10.25 वाजता पोहोचणार आणि पुढे मिरज स्थानकांवर मध्यरात्री 1 वाजता पोहोचणार आहे.
advertisement
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व रेल्वे भाविकांनी सदरच्या विशेष गाड्यांच्या वेळा लक्षात घेऊन आपला प्रवास निश्चित आणि सुरक्षित करावा, असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
November 06, 2024 10:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पंढरीची वारी..! कार्तिकी एकादशीनिमित्त धावणार विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक