कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरातील नित्योपचारात होणार बदल, भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरु
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
आषाढीच्या वारीनंतर भाविकांना उत्सुकता असते ती कार्तिकी एकादशीची. कार्तिकी सोहळ्याला येणाऱ्या हजारो भाविकांना अखंड देवाच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी आज देवाचा पलंग निघणार असून आजपासून देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.
सोलापूर : आषाढी-कार्तिकी भक्तगण येती... म्हणत पंढरीच्या पांडरायाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे, आषाढीच्या वारीनंतर भाविकांना उत्सुकता असते ती कार्तिकी एकादशीची. कार्तिकी सोहळ्याला येणाऱ्या हजारो भाविकांना अखंड देवाच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी आज देवाचा पलंग निघणार असून आजपासून देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.
आषाढी आणि कार्तिकी या दोन यात्रांसाठी राज्यभरातून लाखो भावी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या यात्रा कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी आजपासून देव 24 तास दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. आजपासून कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे. यासाठी आषाढी आणि कार्तिकी यात्रा कालावधीत देवाची निद्रा बंद होत असल्याने परंपरेप्रमाणे देवाचा पलंग आज काढला जाणार आहे. याचाच अर्थ भक्तांसाठी विठुराया आजपासून 24 तास मंदिरात उभा असणार आहे. चांगला मुहुर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढण्याची परंपरा आहे. यावर्षी कार्तिकी साठी आज दिनांक 04 नोव्हेंबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून सकाळी श्रींचा पलंग काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
advertisement
अखंड दर्शनासाठी उभा राहणाऱ्या विठुरायाला थकवा जाणू नये म्हणून देवाच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा तक्क्या देण्यात येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर नित्य पूजा, नैवेद्य ,पोशाख आणि लिंबू पाणी या विधी व्यतिरिक्त जवळपास देव सव्वा बावीस तास भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे .
advertisement
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस, महाप्रसाद समर्पित करण्यासाठी देणगी देऊन महाप्रसाद सहभाग योजनेत भाग घेता येतो. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. तसेच येणाऱ्या भाविकांना कसलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी देखील मंदिर समितीकडून काळजी घेण्यात येत आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस महानैवेद्य समर्पित करण्यासाठी रू.7,000/- देणगी देऊन महानैवेद्य सहभाग योजनेत सहभागी होता येते. त्याची दिनांक 01 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील नोंदणी देखील सुरू करण्यात आली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 224466 व 223550 या क्रमांकावर व श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथील देणगी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
November 04, 2024 9:25 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरातील नित्योपचारात होणार बदल, भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरु