खासदारकी याच्याकडे, आमदारकी पण याच्याकडेच ठेवायला निघालाय, अजितदादांचा सडकून प्रहार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पारनेरमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रेची सभा आयोजित करण्यात आलेली होती.
अहिल्यानगर, अहमदनगर : निलेश लंके याच्याकडे खासदार आहे, आता त्याच्याच घरात आमदारकी यावी, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पारनेकरांनो असे जर झाले तर तुम्हाला कुणी वाली राहणार नाही, असे आवाहन करीत एकसंध राहा, आपण त्याचा (निलेश लंके) पराभव करू, असे आक्रमक भाषण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्याचवेळी पारनेरकरांना मी सावध करण्यासाठी आलो असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
पारनेरमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रेची सभा आयोजित करण्यात आलेली होती. अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना खासदार निलेश लंके यांना जोरदार लक्ष्य केले.
त्याच्या गुंडगिरी, दादागिरीवर लवकरच तोडगा काढतो
ते म्हणाले, पारनेरच्या सुप्यात औद्योगिक वसाहत आहे. परंतु तेथे मोठी दहशत आणि दादागिरी असल्याचे माझ्या कानावर आले आहेत. अनेक लोक तक्रार करीत असतात. उद्योगपतींनीही माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. वाळू सिमेंट खडी अमुक एका माणसाकडून घ्यावी, असा त्याचा (निलेश लंके) आग्रह असतो. आमच्याकडेही औद्योगिक वसाहती आहेत, पण आम्ही तिथे कुठल्याही प्रकारची दादागिरी करीत नाही. म्हणून आमच्याकडे उद्योगधंदे सुरळीत चालतात. त्याच्या गुंडगिरी, दादागिरीवर लवकरच तोडगा काढतो, असे अजित पवार म्हणताच उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला.
advertisement
निलेश लंके यांच्याभोवती असलेल्या चांडाळ चौकटीने तालुक्याच्या वाटोळे केले
पारनेरमधील राजकारण बदलले आहे. निलेश लंके याला आमदार केले आहे. तो तिकडे (शरद पवार) गेला. त्याने भूमिका बदलली. मी पारनेरला मोठा निधी दिलाय, निलेश लंके यांच्याभोवती असलेल्या चांडाळ चौकटीने तालुक्याच्या वाटोळे केले आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
पारनेरकरांनो जर त्याच्याच घरात दोन्ही पदे गेली तर तुम्हाला कुणी वाली राहणार नाही
निलेश खासदार आहे. त्याला त्याच्याच घरी आता आमदारकी ठेवायची आहे. पारनेरकरांनो जर त्याच्याच घरात दोन्ही पदे गेली तर तुम्हाला कुणी वाली राहणार नाही. पारनेर तालुक्यात मोठी दहशत आहे. पारनेरकरांनो भावनिक होऊ नका, असे अजित पवार म्हणाले.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Oct 19, 2024 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
खासदारकी याच्याकडे, आमदारकी पण याच्याकडेच ठेवायला निघालाय, अजितदादांचा सडकून प्रहार







