Nashik Teacher Constituency : निवडणुकीआधीच भाजपमध्ये दुफळी? विखेंच्या विरोधात भाजप नेत्यानेच थोपटले दंड!
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघात यावेळी भाजपचे विवेक कोल्हे आणि राजेंद्र विखे यांची लढत बघायला मिळणार आहे. एकाच पक्षात असूनही एकमेकांचे विरोधक असलेले 2 दिग्गज अपक्ष उमेदवारी करत आहेत.
अहमदनगर, (हरीष दिमोटे, प्रतिनिधी) : एकाच पक्षात असूनही एकमेकांना शह काटशह देणारे दोन कुटूंब पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील 2 दिग्गज घराणे नाशिक शिक्षक मतदारसंघात एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुणे विद्यापिठाचे सिनेट सदस्य असलेले राजेंद्र विखे यांचा शिक्षकांशी दांडगा संपर्क आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न मला सोडवायचे आहेत, त्यासाठी मी उमेदवारी करत असल्याचं राजेंद्र विखे यांनी म्हटलं आहे.
आज सकाळी ग्रामदैवत म्हसोबाचे दर्शन घेऊन राजेंद्र विखे यांनी आपला अर्ज दाखल केला असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याचं राजेंद्र विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
काही दिवसापूर्वीच भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला असून मतदारसंघात भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत. एकिकडे हा मतदारसंघ शिंदे गटाकडे असताना भाजपच्या विखे आणि कोल्हेंनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींची यास संमती आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
advertisement
विखे आणि कोल्हे कुटूंबीय अनेक वर्षांपासून पारंपरिक राजकीय विरोधक राहीले आहेत. काही महिन्यांपूर्वीच विखेंची सत्ता असलेल्या गणेशनगर साखर कारखान्यावर आणि काही ग्रामपंचायतीवर देखील कोल्हेंनी सत्ता मिळवत विखेंना शह दिला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात जर विखे आणि कोल्हे यांची लढत झाली तर ही लढाई रंगतदार होणार आहे. मात्र, अर्ज माघारीच्या दिवशी खरं चित्र स्पष्ट होणार आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jun 03, 2024 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Nashik Teacher Constituency : निवडणुकीआधीच भाजपमध्ये दुफळी? विखेंच्या विरोधात भाजप नेत्यानेच थोपटले दंड!







