अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठं खिंडार, रोहित पवारांचा विश्वासू शिलेदार शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अहमदनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : अहमदनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. कर्जत, जामखेड मतदारसंघात मोठा राजकीय भूंकप झाला आहे. राष्ट्रवादीचे युवानेते आणि जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकला आहे. त्यांनी भाजप नेते राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पवनराजे राळेभात यांनी चौंडी येथे राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. पवनराजे राळेभात यांचा भाजपा प्रवेश आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे. तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.
advertisement
रोहित पवारांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी
दरम्यान दुसरीकडे बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी २४ जानेवारी रोजी त्यांची या प्रकरणात पहिल्यांदा ईडीकडून चौकशी झाली होती. आज पुन्हा एकदा रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीने १९ जानेवारी रोजी समन्स बजावले होते. २४ जानेवारी रोजी तब्बल १२ तास रोहित पवारांची ईडीनं चौकशी केली होती.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 01, 2024 7:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठं खिंडार, रोहित पवारांचा विश्वासू शिलेदार शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात







