मतदानादरम्यान राज्यात अनेक भागांत गोंधळ, कार्यकर्ते भिडले-एकमेकांना मारले, अजितदादा संतापले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: राज्यातील अनेक भागांत वादाचे प्रसंग घडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करीत अशा घटनांवर संताप व्यक्त केला.
मुंबई : नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकींसाठी राज्यात मंगळवारी मतदान संपन्न झाले. मात्र राज्यातील प्रत्येक विभागात मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. कुठे सत्ताधारी आमदारांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले तर कुठे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार संघर्ष झाला. नाशिक, बुलढाणा, सोलापूर, मुक्ताईनगर, अंबरनाथ, बीड, गेवराई, महाड, रायगड, धाराशिव आदी ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडल्याने मतदानाला गालबोट लागले.
राज्यातील अनेक भागांत वादाचे प्रसंग घडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करीत अशा घटनांवर संताप व्यक्त केला. अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्याचबरोबर लोकशाहीत हिंसेचाराला स्थान नसल्याचे सांगत कुणाला निवडून द्यायचे ते जनतेला ठरवू द्या, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
हिंसाचाराला लोकशाहीत स्थान नाही
महाराष्ट्रातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हिंसाचाराला आपल्या लोकशाहीत कोणतंही स्थान नाही. निवडणूक ही पवित्र प्रक्रिया आहे आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात, कोणाच्याही दबावाखाली न येता मतदानाचा आपला मूलभूत हक्क बजावता आला पाहिजे.
ते लोक संविधानाच्या विरोधात वागत आहेत
advertisement
आपले अमूल्य मत कोणाला द्यायचं, कोणाला निवडून आणायचं हे जनतेला ठरवू द्या. आघाडी हा धर्म राजकीय वर्तुळातील सर्वांनी पाळला पाहिजे. परंतु त्याही पुढे जाऊन, जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल किंवा जोर-जबरदस्तीनं मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल, तो संविधानाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या मूल्यांच्या विरोधात वागत आहे. अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 6:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानादरम्यान राज्यात अनेक भागांत गोंधळ, कार्यकर्ते भिडले-एकमेकांना मारले, अजितदादा संतापले


