दादा गेले, सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, 12 तासातच फडणवीसांचा मोठा निर्णय
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता शपथविधीला १२ तास होत नाहीत, तोपर्यंत फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
राहुल झोरी, प्रतिनिधी मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी हा शपथविधी झाल्याने आता यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला शपथविधीबाबत काहीच माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
शनिवारी सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. एकीकडे शपथविधी पूर्ण होताच मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या राज्यातील सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. एकही सभा घेणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
खरं तर, सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत प्रचाराचा कालावधी आहे. पण अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
शेवटच्या सात दिवसांत त्यांच्या 22 प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. महापालिका निवडणुकीत मोठा विजय संपादन केल्यानंतर भाजप सर्व ताकदीने जिल्हा परिषद निवडणुकीत उतरलं होतं. पण अजित पवारांच्या अकाली निधनाने फडणवीसांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत. ते यंदा एकही सभा घेणार नाहीत. राज्यात सध्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत. 5 तारखेपर्यंत प्रचारअवधी होता. ७ तारखेला मतदान पार पडणार आहे.
advertisement
सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईघाईने शपथ का घेतली? राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी एवढी घाई का केली? असे प्रश्न महाराष्ट्रात चर्चिले जात असताना या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिली आहे.
दादा अकाली गेले, दुःखाचा डोंगर आहे पण...
दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार असल्याचे ते म्हणाल्या.
advertisement
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.
दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 9:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादा गेले, सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, 12 तासातच फडणवीसांचा मोठा निर्णय








