काल सर्व कार्यक्रम रद्द, आज अजितदादांची मंत्रालयात बैठक, अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: पोलीस अधिकारी अंजना कृष्णा कॉल प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी अजित पवार यांनी माध्यमांसमोर येण्याचे टाळले. बुधवारी तर त्यांनी आजारी असल्याचे सांगून दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले.
मुंबई : सोलापूरमधील करमाळ्याच्या पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी झालेला फोनकॉल आणि त्यानंतर चौफेर झालेली टीका यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे बॅकफूटला गेले आहेत. केवळ राज्यातूनच नाही तर देश पातळीवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी अजित पवार यांनी माध्यमांसमोर येण्याचे टाळले. बुधवारी तर त्यांनी आजारी असल्याचे सांगून दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले. गुरुवारीही अजित पवार आजारपणामुळे कार्यक्रम रद्द करणार का? अशी चर्चा होत असताना त्यांनी मंत्रालयात नियमित काम सुरू केले.
अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात घेण्यात आली. यावेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात यावीत. या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ स्ट्रक्चरला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला हेरिटेज टच द्यावा. श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
advertisement
मूळ स्ट्रक्चरला कोणताही धक्का न लावता काम करा
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर (मोरगाव), चिंतामणी गणपती (थेऊर), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव), वरदविनायक (महड), सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या मंदिरांच्या परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने करण्यात यावीत. मंदिराच्या मूळ स्ट्रक्चरला कोणताही धक्का न लावता काम करण्यात यावे. अष्टविनायक मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, मंदिर परिसरात अधिक मोकळी जागा उपलब्ध करावी. मूळ मंदिराशी विसंगत ठरणारी परिसरातील बांधकामे काढून टाकून आपत्कालीन स्थितीत मंदिर परिसरात अॅम्ब्युलन्ससह अग्निशमन गाड्या सहज जाऊ शकतील अशी मार्गव्यवस्था ठेवण्यात यावी.
advertisement
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा, उच्च दर्जाच्या सेवा द्या
पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राला प्रचंड संधी असून पर्यटनाची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. केरळ, ओडिशा यांसारख्या राज्यांच्या धर्तीवर विदेशी पर्यटक, परराज्यातील भाविक आणि नवी पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा, उच्च दर्जाच्या सेवा व पर्यटनाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 8:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काल सर्व कार्यक्रम रद्द, आज अजितदादांची मंत्रालयात बैठक, अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश