२० टक्के व्याजाने कर्ज, सावकाराकडून ८ लाखांची मागणी, पिचलेल्या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून अकोल्याच्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.
कुंदन जाधव, प्रतिनिधी, अकोला : अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून अकोल्यातली शेतकऱ्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. सावकारीविरोधात राज्य सरकारने कितीही कडक कायदे आखले तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण थांबत नसल्याचे चित्र आहे.
बेलुरा खुर्द येथील शेतकरी गोपाल वामनराव पाटेखेडे यांनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी गोपालने व्हिडीओ काढून संपूर्ण हकीकत सांगितली आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे तब्बल नऊ दिवसानंतर याप्रकरणी पातूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. गोपालने आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओतून त्यांनी सावकार राकेश भोपेंद्र गांधी व सचिन उर्फ बंटी अरुण खरक यांनी २०% व्याजाने घेतलेल्या रकमेची परतफेड झाल्यानंतरही जबरदस्तीने आणखी ८ लाखांची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे.
advertisement
मृत शेतकऱ्याच्या भावाने तक्रारीत काय म्हटले आहे?
मृतकाचे मोठे भाऊ नागेश पाटेखेडे यांनी तक्रारीत म्हटले की, सावकारांनी जबरदस्ती आणि धमकी देत शेत सर्वे नं. ७२ मधील ४० आर जमीन (दस्त क्रमांक 2159/2025) सावकारी व्यवहारात खरेदी करून घेतली. ही रक्कम परत केल्यानंतरही धमक्या सुरू होत्या, ज्यामुळे गोपाल नैराश्येत गेले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement
टोकाचं पाऊल उचण्याआधी काळीज चिरणारे सवाल
सावकाराने मला पैसे दिले होते. मी त्याचे सगळे पैसे दिले. पण तरीही तो अजूनही म्हणतो पैसे आहेतच... त्याने माझे शेत नावावर करून घेतले. शेत पुन्हा तुला देणार नाही, असे सतत तो धमकावतो आहे. ते शेत विकून टाकतो, असे तो मला सांगतोय. असं जर झालं तर माझ्या लेकराला मी शेती कुठून आणू? असा काळीज चिरणारा सवाल मृत शेतकऱ्याने आत्महत्येआधीच्या व्हिडीओतून विचारला.
view commentsLocation :
Akola,Maharashtra
First Published :
December 05, 2025 7:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२० टक्के व्याजाने कर्ज, सावकाराकडून ८ लाखांची मागणी, पिचलेल्या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं


