Amravati News: 15 वर्षांच्या मेहनतीवर पाणी, संत्र्याच्या बागा आडव्या, अस्मानी संकटाचा शेतकऱ्यांना फटका!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Heavy Rain: विदर्भात झालेल्या अतिमुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावतीतील शेतकरी संकटात असून संत्र्याच्या बागा आडव्या झाल्या आहेत.
अमरावती: राज्यातील काही भागात गेल्या 2 दिवसांत पावसाने थैमान घातले आहे. अमरावती जिल्ह्यात 15 आणि 16 ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील झाला आहे. त्या पावसाचा सर्वाधिक फटका मोर्शी आणि चांदुर बाजार तालुक्यात बसलाय. या भागातील अनेक शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली गेली असून जमीन खरडून गेली आहे. कपाशी, संत्रा, तूर, केळी आणि इतरही अनेक पिकांना त्या पावसाचा चांगलाच फटका बसलाय. कपाशी आणि तूर पिके पूर्णतः खराब होण्याच्या मार्गावर आहे. शेतातील पाणी अजूनही बाहेर पडलेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.
कपाशी आणि तुरीला सर्वाधिक फटका
पावसामुळं झालेल्या नुकसानी बाबत लोकल18 सोबत बोलताना शेतकऱ्यांनी माहिती दिली. चांदूर बाजार तालुक्यातील काजळी येथील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार, सर्वाधिक फटका हा कपाशी आणि तूर पिकाला बसलेला आहे. या पिकातून हाती काही लागेल की नाही अशी परिस्थिती आहे. बियाणे, मशागत आणि इतरही अनेक खर्च करून ही पिकं शेतकऱ्यांनी उभी केली होती. मात्र, या पावसाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरलं आहे. तसेच मोर्शी तालुक्यात देखील काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कपाशी आणि तुरीचे क्षेत्र पूर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर आहे. आता शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे, असं शेतकऱ्यांनी सांगितलं.
advertisement
झाडांखाली संत्र्याचा सडा
चांदूर बाजार तालुक्यातील कल्होडी या गावातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका झाडाखाली जवळपास 300 संत्रांची गळ झाली आहे. काही शेतात संत्राची झाडे ही मुळासकट उखडली गेली आहेत. अवघ्या अर्ध्या तासात शेतकऱ्यांचं 50 ते 50 टक्के नुकसान या गावामध्ये झालेलं आहे.
advertisement
“शेतकऱ्याने नेमकं करावं तरी काय? झाडं लहान असताना जंगली जनावरांची भीती? त्यातून वाचले तर रोगांची भीती आणि आता पावसाने तर कहरच केला. गेल्या 15 वर्षात असं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं नाही. संत्र्याचं आख्खं झाड मुळासकट उखडणे म्हणजे शेतकऱ्यांची 15 वर्ष केलेली मेहनत पूर्ण वाया गेली. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळण्या आधीच त्यावर आघात झाला. निसर्गाचा कोप समजून शेतकरी आता स्वतःला सावरत आहे. मात्र आता, शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेऊन नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी सर्वच शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
August 19, 2025 1:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati News: 15 वर्षांच्या मेहनतीवर पाणी, संत्र्याच्या बागा आडव्या, अस्मानी संकटाचा शेतकऱ्यांना फटका!

