Anil Parab : अनिल परबांकडून गद्दार उल्लेख, शंभुराज देसाई म्हणाले, बाहेर ये तुला दाखवतो...विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
Anil Parab Shambhuraj Desai : ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या जोरदार हमरीतुमरी झाली. मराठी माणसाच्या मुद्यावर बोलताना ही खडाजंगी झाली
प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई: राज्य विधानपरिषदेत आज वातावरण चांगलेच तापले. विरोधी बाकांवरील ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या जोरदार हमरीतुमरी झाली. मराठी माणसाच्या मुद्यावर बोलताना ही खडाजंगी झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या तुफानी शाब्दिक वादामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सभागृहातील वातावरण तापल्यानंतर अखेर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबई आणि महानगर भागात आता मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. यामध्ये उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील 40 टक्के घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याची मागणी परब यांनी केली. सरकारने आता याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत हमरीतुमरी...
महायुती सरकारकडून शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना ठाकरे गटाला लक्ष्य केले. तुम्ही मराठी माणसासाठी काही केलं नाही असा आरोप त्यांनी केला. तुमचं मराठी आणि मराठी माणसावरील प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. त्यावर परब हे संतापले आणि देसाई यांनी प्रत्युत्तर देत सरकार काय करणार हे सांगा असे म्हटले. मात्र, शंभूराज देसाई यांनी परब यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू ठेवला.
advertisement
या चर्चेदरम्यान अनिल परब यांनी शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की,शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते. या आरोपामुळे चिडलेले शंभूराज देसाई क्षणात आक्रमक झाले. त्यांनी परब यांना थेट प्रत्युत्तर दिले, "तू गद्दार कोणाला बोलतोस? बाहेर ये, तुला दाखवतो!" एवढ्यावरच न थांबता देसाई म्हणाले, "तूच तर बूट चाटत होतास", अशा शब्दांत त्यांनी अनिल परबांवर बोचरा वार केला.
advertisement
सभागृहात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. अखेर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2025 1:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anil Parab : अनिल परबांकडून गद्दार उल्लेख, शंभुराज देसाई म्हणाले, बाहेर ये तुला दाखवतो...विधान परिषदेत जोरदार खडाजंगी