अजितदादा १२ डिसेंबरला शरद पवारांना गिफ्ट देणार होते, बोलणंही झालं होतं पण... अंकुश काकडेंनी किस्सा सांगितला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती. काही अंशी ती इच्छा पूर्णही झाली. पण अजित पवार यांच्या हयातीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या ते पाहू शकले नाहीत.
पुणे : अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणल्यानंतर लाखोंची गर्दी स्तब्ध झाली. आधीपासून उपस्थित असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांना हुंदके अनावर झाले. या सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार अगदी शांत होते. खिन्न मनाने ते अजित पवार यांच्या पार्थिवाकडे पाहत होते. कामात वाघ असलेल्या पुतण्याला अशा पद्धतीने निरोप द्यावा लागेल, असे कधी त्यांच्या मनातही आले नसेल. काकाच्या कृपेने आमचं बरं चाललंय, असे अजित पवार म्हणायचे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अपवाद वगळता अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याबद्दल कायम कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती. काही अंशी ती इच्छा पूर्णही झाली. पण अजित पवार यांच्या हयातीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या ते पाहू शकले नाहीत. याबद्दलचा किस्सा ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सांगितला.
अंकुश काकडे काय म्हणाले?
अजित पवार आणि माझ्या राजकारणाची सुरुवात एकाच काळात झाली. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून आम्ही कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे अजित पवार यांनी खासदार, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर काम केले. पण हे करीत असताना जनसामान्यांच्या कामासाठी ते रात्रंदिवस झटत राहिले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरच्या काही काळाने आपण एकत्र आले पाहिजे, असे अजित पवार मला म्हणाले. तुम्ही आणि विठ्ठल शेठ मणियार यांचे पवारसाहेबांशी चांगले संबंध आहेत. तुम्ही एकत्रिकरणाचा विषय काढून बघा. त्यांचे मत जाणून घ्या, असे अजित पवार मला म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्यांनुसार आम्ही शरद पवार यांच्याशीही बोललो होतो. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये तशा प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
advertisement
दोन्ही पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे, अशी अजित पवार यांची तीव्र इच्छा होती. महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रही आलो. त्याआधी १२ डिसेंबरला दोन्ही पक्ष एकत्र आणून अजित पवार यांना पवारसाहेबांना बर्थडे गिफ्ट द्यायचे होते, परंतु काही कारणांनी ते शक्य झाले नाही. त्यांच्या हयातीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीत, ही बोच आम्हालाही लागून राहिलेली आहे, असे जड अंत:करणाने अंकुश काकडे यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 6:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा १२ डिसेंबरला शरद पवारांना गिफ्ट देणार होते, बोलणंही झालं होतं पण... अंकुश काकडेंनी किस्सा सांगितला









