लोकसभेला घड्याळ, आता जिल्हा परिषदेवर कमळ फुलविण्याच्या तयारीत, अर्चना पाटलांचा प्लॅन काय?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Archana Patil Dharashiv ZP Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकसभेतील पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेवर कमळाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : महापालिका निवडणुकांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची देखील लगबग आहे. पुढच्या आठ दिवसांत आचारसंहिता लागू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. धाराशिव लोकसभेतून पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी आसुसल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह घेऊन पराभूत झालेल्या अर्चना पाटील या जिल्हा परिषदेवर कमळाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. येत्या दोन दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागेल असे भाकीत देखील अर्चना पाटील यांनी केले आहे.
मी कशाला पक्ष वाढवू, लोकसभेच्या उमेदवार असताना वक्तव्य
लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हावर अर्चना पाटील लढल्या. परंतु ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांना पराभवाची धूळ चारली. निवडणुकीदरम्यान मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असे वक्तव्य त्यांनी केले. पक्षाच्या उमेदवार असूनही मी कशाला पक्ष वाढवू, असे विधान त्यांनी केल्याने देशभरात त्यांची चर्चा झाली.
advertisement
अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश नाही पण आतापासून प्रचाराला सुरुवात
आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन दिवसात लागतील आणि जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा कमळाचा झेंडा फडकवायचा आहे, असे विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कारण अर्चना पाटील यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलेला नसतानाही कमळाचा प्रचार त्यांनी आतापासूनच सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
advertisement
निंबाळकर-पवार नातलग
अर्चना पाटील या आमदार राणा जगजीतसिंह निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. राणा जगजीतसिंह निंबाळकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु राज्यात सत्तापालट झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निंबाळकर घराणे पवार कुटुंबाचे जवळचे नातलग. पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे सख्खे बंधू. याचाच अर्थ सुनेत्रा पवार या राणा जगजीतसिंह यांच्या आत्या आहेत. म्हणूनच अजित पवार यांनी लोकसभेला अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली होती.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 3:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लोकसभेला घड्याळ, आता जिल्हा परिषदेवर कमळ फुलविण्याच्या तयारीत, अर्चना पाटलांचा प्लॅन काय?







