Ashok Kharat Case: "तुमचं वाटोळं होईल!" पोलिसांना शाप देणारा खरात SIT समोर ढसाढसा रडला, कोर्टातही मोठी घडमोड
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat : अशोक खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अटक केल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनाच धर्म, शाप-कोपाचा धाक दाखवत धमकावणारा अशोक खरात चांगलाच हतबल झाल्याची माहिती आहे.
नाशिक: अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अशोक खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अटक केल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनाच धर्म, शाप-कोपाचा धाक दाखवत धमकावणारा अशोक खरात चांगलाच हतबल झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली असून त्याचा माज उतरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांकडून तपासाचा फास घट्ट केला जात असल्यानं खरात कोठडीतच ढसाढसा रडत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले. खरातविरोधात आता तिसऱ्या गुन्ह्याचा खटला सुरू होणार आहे.
पोलिसांनाच द्यायचा शाप!
अटक झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात खरातचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला होता. तपासासाठी आलेल्या एसआयटी (SIT) अधिकाऱ्यांशी तो केवळ उद्धटपणे वागलाच नाही, तर त्यांना उलट शाप देण्याचाही प्रयत्न करत होता. "तुम्ही पाप करत आहात, तुमच्यावर देवाचा कोप होईल," अशा शब्दांत त्याने पोलिसांवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. राजकीय पाठबळ पाठीशी असल्याने कोणीही आपले काहीही वाकडे करू शकणार नाही, अशा भ्रमात तो होता.
advertisement
तपासाच्या चक्रात पुरता अडकला
मात्र, एसआयटीने जसा पुराव्यांचा डोंगर उभा केला आणि खरातच्या काळ्या कारनाम्यांची पोलखोल सुरू केली, तशी त्याची परिस्थिती बदलली. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच खरातचा सारा अहंकार गळून पडला आहे. जो बाबा पोलिसांना घाबरवत होता, तोच आता कोठडीत दोन-तीन वेळा रडला असून, ढसाढसा रडत तो आता पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
कोर्टात आज काय घडलं?
अशोक खरातला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने खरातला दुसऱ्या गुन्ह्यात २१ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या गुन्ह्यात SIT खरातचा ताबा घेणार, त्यानंतर 24 तासाच्या आत पुन्हा कोर्टात हजर करणार आहेत. तिसऱ्या गुन्ह्याच्या सुनावणीवेळी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
एका महिलेच्या लैगिंक अत्याचारा प्रकरणात खरातवर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी महादेवाचा अवतार आहे, मी सांगतो तसे कर. कोणाला काही सांगितलं तर मुलांचा मृत्यू होईल अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती. अत्याचार करण्यापूर्वी खरातने या महिलेला गुंगी आणणारे पाणी पिण्यास दिले होते. आता या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 12:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: "तुमचं वाटोळं होईल!" पोलिसांना शाप देणारा खरात SIT समोर ढसाढसा रडला, कोर्टातही मोठी घडमोड









