Nandigram Express: 100च्या स्पीडने होती रेल्वे, अचानक आवाज झाला अन् प्रवाशांच्या काळजाचा चुकला ठोका, नंदीग्रामसोबत काय घडलं?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Nandigram Express: नंदीग्राम एक्सप्रेस पाठोपाठ एका मालवाहू रेल्वेसोबतही हाच प्रकार घडला. याबाबत एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
छत्रपती संभाजीनगर : नंदिग्राम एक्सप्रेसमधील प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. ताशी 100 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाडीसमोर अचानक रेल्वे रुळावर काँक्रीटचे मोठे तुकडे आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, लोको पायलटच्या (रेल्वेचालक) प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाबाबत आणि आणि सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
केंब्रिज चौक परिसरातील रेल्वे रुळावर मंगळवारी मध्यरात्री 12 वाजून 35 मिनिटे ते 12 वाजून 58 मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. नंदीग्राम एक्सप्रेस पाठोपाठ एका मालवाहू रेल्वेसोबतही हाच प्रकार घडला. या घटनेत दोन्ही गाड्यांच्या इंजिनचं नुकसान झालं आहे. याबाबत एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदीग्राम एक्सप्रेस मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरहून जालन्याच्या दिशेने रवाना झाली. ही गाडी केंब्रिज चौकाजवळील उड्डाणपुलाखालून जात असताना रेल्वे चालकाला रुळावर सिमेंटचे दगड ठेवल्याचं लोको पायलटच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्याने तत्काळ रेल्वे थांबवली. पण, गाडीचा वेग ताशी 100 किलोमीटर असल्याने ब्रेक लागेपर्यंत रेल्वेने दगडांना उडविलं. यावेळ निर्माण झालेल्या जोरदार आवाजामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
advertisement
याबाबत माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्र गस्तीवरील असलेले कर्मचारी जाधव व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक भास्करराव, उपनिरीक्षक के. चंदूलाल, जमादार खान यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रुळावर सिमेंटच्या तुकड्यांचा चुरा आढळला. सिमेंटचे तुकडे रेल्वे इंजिनच्या कॅटल गार्डला लागल्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे. त्यानंतर आणखी एक मालगाडी जालन्याकडे जाताना काही अंतरावर पुन्हा असाच प्रकार घडला.
advertisement
नंदीग्राम एक्सप्रेसच्या लोको पायलटने जालना स्टेशन मास्तरला याबाबत माहिती दिली. त्यांनी करमाड रेल्वे स्टेशनलापर्यंत निरोप पोहचवला. करमाड येथील कनिष्ठ अभियंता अनुजकुमार सोरनसिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास त्यांना नांदेड रेल्वे कंट्रोलचा कॉल आला होता. चिकलठाणा शिवारातील केंब्रिज चौकाच्या पुढे पोल क्र. 126/6 व 126/7 आणि पोल क. 126/1 व 127/2 च्या दरम्यान रेल्वे रुळावर सिमेंट काँक्रीटचे तुकडे ठेवले असून, रेल्वे रुळावरून उतरावी व अपघात घडावा या उद्देशाने हे कृत्य केलं असल्याची माहिती त्यांना मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंडे करत आहेत.
advertisement
पॅरलल इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेल्या गोष्टी
घटनास्थळापासून काही अंतरावर इमारतींचं काम सुरू आहे. त्या परिसरातून हे सिमेंट काँक्रीटचे तुकडे आणले असावेत, अशी शक्यता आहे. याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नसलेल्या आणि गस्तीचं प्रमाण कमी असल्याने आरोपींनी या जागेची निवड केली असावी, असा अंदाज आहे. आरोपींनी मुद्दाम जास्त प्रवासी असलेल्या गाडीची निवड केली. रुळापासून हायवे जवळ आहे. त्यामुळे हे कृत्य करून पसार होण्यासाठी सहज संधी मिळते.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 11, 2025 11:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nandigram Express: 100च्या स्पीडने होती रेल्वे, अचानक आवाज झाला अन् प्रवाशांच्या काळजाचा चुकला ठोका, नंदीग्रामसोबत काय घडलं?