सिंधुदुर्ग हादरलं! मध्यरात्री खूनी खेळ, घरात झोपलेल्या महिलेला करंट देऊन मारण्याचा प्रयत्न, कारण काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील घोटगे ख्रिश्चनवाडी गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
प्रसाद पाताडे, प्रतिनिधी सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील घोटगे ख्रिश्चनवाडी गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका हिलेला रात्रीच्या वेळी घरात घुसून विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने विद्युत वाहक तार महिलेपर्यंत पोहोचली नसावी, म्हणून तिचा जीव वाचला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. ही खळबळजनक घटना काल (रविवार) रात्री घडली. हा प्रकार चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
नेमके काय घडले?
लीना जोसेफ लॉन्ड्रीक्स असं हत्येचा प्रयत्न झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या घोटगे ख्रिश्चनवाडीतील रहिवासी असून त्या घरी एकट्याच असतात. रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरावर चढून प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने काठीच्या मदतीने लीना लॉन्ड्रीक्स यांना विजेचा शॉक देऊन जीवे मारण्याचा क्रूर प्रयत्न केला. सुदैवाने या प्रयत्नातून त्या बचावल्या. या घटनेमुळे संपूर्ण कुडाळ तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत तात्काळ कुडाळ पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
advertisement
स्थानिक नागरिक आक्रमक
या घटनेनंतर स्थानिक नागरिक अत्यंत आक्रमक झाले आहेत. हा प्रकार केवळ चोरीच्या उद्देशानेच झाला असावा, असा अंदाज नागरिक व्यक्त करत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक (डॉग स्क्वॉड) घेऊन तपास करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. रात्रीच्या वेळी अशाप्रकारे एकट्या राहणाऱ्या महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
August 25, 2025 2:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिंधुदुर्ग हादरलं! मध्यरात्री खूनी खेळ, घरात झोपलेल्या महिलेला करंट देऊन मारण्याचा प्रयत्न, कारण काय?


