अजित पवारांचा बालेकिल्ला धोक्यात? कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळला, उमेदवारांनी केलं पलायन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे राजकीय कट्टर विरोधक रंजनकुमार तावरे यांच्यात अनपेक्षित युती झाली आहे
माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे राजकीय कट्टर विरोधक रंजनकुमार तावरे यांच्यात अनपेक्षित युती झाली आहे. पण ही युती स्थानिक कार्यकर्त्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. पाच महिन्यांपूर्वी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कडवट शत्रुत्व असलेले हे दोन्ही गट आता एकत्र आल्यामुळे अनेक प्रभागांत कार्यकर्त्यांनी थेट बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
अजित पवार गटात नाराजीचा महास्फोट
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना डावलून थेट कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला होता. कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन तावरे पॅनलचा पराभव करत अजित पवारांना विक्रमी विजय मिळवून दिला होता. मात्र, आता नगरपंचायत निवडणुकीत त्याच नेत्यांनी अचानक जुळवलेली युती पाहून कार्यकर्त्यांमध्ये संतापाचा महास्फोट झाला आहे.
advertisement
युतीमुळे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातील असंतोष उफाळून आला आहे. तिकीट वाटप आणि पदवाटपातील असंतोषामुळे काही कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागांमधील उमेदवारी मागे घेण्यास साफ नकार दिला आहे. "माळेगावचा कार्यकर्ता लढणारा आहे, रडणारा नाही" अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून सोशल मीडियावर देखील याबाबत सूचक चर्चा सुरू आहे.
"आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का?" कार्यकर्त्यांचा सवाल
advertisement
"नेते पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवतात आणि निवडणुका आल्या की, कार्यकर्त्यांचा सोयिस्कर विसर पडतो. मग आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का?" असा संतप्त सवाल बंडखोर कार्यकर्ते विचारत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांकडून दबाव येत आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी गावातून तात्पुरतं पलायन केल्याच्या देखील चर्चा आहे.
एकंदरीत, माळेगावमध्ये अजित पवार आणि रंजनकुमार तावरे यांच्यातील राजकीय युतीमुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि बंडखोरी शिगेला पोहोचली असून, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांचा बालेकिल्ला धोक्यात असल्याची चर्चा आहे.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 2:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांचा बालेकिल्ला धोक्यात? कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळला, उमेदवारांनी केलं पलायन


