ज्या हातांनी लेझीम धरली, तिथेच जीव सोडला! शाळेच्या मैदानावर मुलांसमोरच मुख्याध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पा. पारगाव जिल्हा परिषद शाळेत लेझीम शिकवत असताना मुख्याध्यापक संतोष बन्सी आणेराव यांना हृदयविकाराचा झटका येऊन निधन, शिक्षण क्षेत्रात हळहळ.
बीड: शाळेचं मैदान, मुलांचा लेझीमचा कडकडाट आणि त्याच तालावर पाय थिरकवणारे त्यांचे लाडके शिक्षक. सगळं कसं उत्साहात सुरू होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लेझीमचा एक डाव पूर्ण होतो ना होतो, तोच शिक्षक अचानक जमिनीवर कोसळले आणि पुन्हा कधीच उठले नाहीत. बीडच्या धारूर तालुक्यातील पा. पारगाव जिल्हा परिषद शाळेत सोमवारी दुपारी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.
धारूर तालुक्यातील पारगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेतील चिमुकल्यांना लेझीम शिकवत असतानाच एका मुख्याध्यापकावर काळाने घाला घातला. शाळेतील विद्यार्थ्यांना लेझीमची शिकवत असताना मुख्याध्यापक संतोष बन्सी आणेराव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी शाळेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. दुपारी खेळाच्या तासाला मुख्याध्यापक आणेराव हे विद्यार्थ्यांना लेझीमचे डाव शिकवत होते. मुले उत्साहात लेझीम खेळत असतानाच अचानक आणेराव यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने वडवणी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
advertisement
विद्यार्थ्यांसमोरच काळाचा घाला
ज्या शिक्षकाकडून लेझीमचे धडे गिरवत होते, तेच शिक्षक अचानक डोळ्यांसमोर कोसळल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे. संतोष आणेराव हे केवळ तीन महिन्यांपूर्वीच या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. अतिशय मनमिळावू स्वभावाचे शिक्षक अशी त्यांची ओळख होती.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
संतोष आणेराव हे मूळचे बीड तालुक्यातील मौज येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते बीड शहरात स्थायिक झाले होते. अवघ्या ४० व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका कर्तबगार शिक्षकाच्या अशा अचानक जाण्यामुळे पारगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 8:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्या हातांनी लेझीम धरली, तिथेच जीव सोडला! शाळेच्या मैदानावर मुलांसमोरच मुख्याध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू










