Pune Water Cut: पुणेकर पाणी जपून वापरा, 2 दिवस खोळंबा होणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 2 दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून पाणी जपून वापरावं लागेल.
पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रावेत उपसा केंद्र येथून पुणे शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बाजूला हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी, 21 जानेवारी रोजी हे काम करण्यात येणार असल्याने तांत्रिक कामासाठी संबंधित जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचा परिणाम शहरातील काही भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. तसेच गुरुवारी, 22 जानेवारी रोजी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
रावेत उपसा केंद्र ही पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याची महत्त्वाची यंत्रणा असून, येथून मोठ्या प्रमाणावर शहराला पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी बाजूला हटविण्याचे काम हे नियोजित विकासकामाचा एक भाग असून, भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या काळात जलवाहिनीवरील दाब पूर्णतः बंद ठेवावा लागणार असल्याने बुधवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा होणार नाही.
advertisement
या कामाचा फटका कळस, माळवाडी, जाधव वस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडीचा काही भाग, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्माशेल परिसर, विमानतळ व परिसरातील नागरिकांना बसणार आहे. या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना या नियोजित कामाची आगाऊ माहिती देत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभागाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करणार असून, कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 7:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut: पुणेकर पाणी जपून वापरा, 2 दिवस खोळंबा होणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर










