"..तरच अण्णा आपल्यात येतील", बीडमध्ये वाल्मीकसाठी चेले लागले कामाला, बॅनर टाकून मागितली मदत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
वाल्मीक कराड तुरुंगात असला तरी त्याच्या समर्थकांकडून तुरुंगाबाहेर एक वेगळीच मोहीम चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले याची गँग सध्या तुरुंगात आहे. वाल्मीक कराड तुरुंगात असला तरी त्याच्या समर्थकांकडून तुरुंगाबाहेर एक वेगळीच मोहीम चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेसाठी कराड समर्थकांकडून निधी देखील गोळा केला जात आहे. या बाबतचे काही बॅनर व्हायरल झाले आहेत. वाल्मीक कराड तुरुंगात असताना त्याच्या समर्थकांकडून अशाप्रकारे मोहीम सुरू केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वाल्मीक कराडच्या नावाने निधी संकलनासाठी क्युआर कोडसह काही बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या बॅनरद्वारे वाल्मीक कराडसाठी निधी गोळा करण्याचे उघड आवाहन करण्यात आले आहे. वाल्मीक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावरही वाल्मीक अण्णांचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील... थोडीशी मदत... अण्णासाठी... आपल्या स्वाभिमानासाठी, असा मजूकर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, या बॅनरसोबतच एक यूपीआय पेमेंट अॅपचा क्यूआर कोड देखील देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचा आहे. बॅनरवरील मजकूर, त्यातील भावनिक आवाहन आणि आरोपीच्या नावावरून निधी मागण्याचा प्रकार यामुळे प्रशासनात आणि सामान्य जनतेत खळबळ माजली आहे. आता ही मोहीम चालवणारी व्यक्ती नक्की कोण आहे? ती वाल्मीक कराडसाठी अशाप्रकारे मोहीम का चालवत आहे? त्याचा वाल्मीकशी काय संबंध आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.
advertisement

संदीप तांदळे याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ बनवून भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना धमकी दिली होती. तसेच त्याने अलीकडेच पार पडलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी देखील निधी गोळा केला होता. अशाच प्रकारचे बॅनर तेव्हाही सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्या बॅनरवर देखील वाल्मीक कराडचा देखील फोटो होता. गंभीर गुन्ह्यातील आरोपीसाठी अशाप्रकारे निधी गोळा करणं सुरू असल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
October 06, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
"..तरच अण्णा आपल्यात येतील", बीडमध्ये वाल्मीकसाठी चेले लागले कामाला, बॅनर टाकून मागितली मदत