Eknath Shinde : ‘हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती’ शिंदेंची ठाकरेंवर खरमरीत टीका
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Eknath Shinde : तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेईमानी करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
बुलढाणा : लोकसभा निवडणुकांचा प्रचार राज्यात शिगेला पोहचला आहे. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊन उबाठा काँग्रेसला कडेवर घेऊन बसले आहेत. तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेईमान करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
सभेला उपस्थित विराट जनसागरामुळे प्रतापराव जाधव यांचा यंदाच्या निवडणुकीत चौकार नक्की झाला आहे. मागच्या निवडणुकीची सभा आणि आता कुठेतरी एका कोपऱ्यात घ्यावी लागणारी सभा अशी केविलवाणी अवस्था उबाठा गटाची झाली आहे. विरोधक आपसामध्ये माऱ्यामारी करुन हरतील आपल्याला फार काही करावे लागणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
1989 साली याच बुलढाण्यात बाळासाहेबांची झंझावाती सभा झाली होती. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसला उखडून फेकून द्या, असे बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हापासून या बुलढाण्यातील जनतेने इथे भगवा अभिमानाने आणि डौलाने फडकत ठेवला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना या निवडणुकीत इथली जनता धडा शिकवेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
advertisement
‘हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती’ असे दुर्देवी काम उबाठाने केले. उबाठामध्ये ‘बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी’ झाले असल्याची अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आदित्य ठाकरेने माझा नीच म्हणून उल्लेख केला. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे त्यांना सहन झाले नाही. त्यांनी माझा नाही तर गोरगरिब, शेतकरी माता भगिनी आणि माझ्या समाजाचा अपमान केला आहे. याचे उत्तर तुम्ही मतपेटीतून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
advertisement
जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या या मतदार संघात हिंदुत्वाचा अपमान इथली जनता कदापी सहन करणार नाही. तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेईमानी करणाऱ्यांना आई भवानी माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. वाघाचे कातडे घालून फिरणाऱ्या शेळ्यांना जनता बरोबर ओळखते. त्यांची अवस्था कुत्र्याच्या शेपटीसारखी झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली.
advertisement
बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार शिवसैनिक आहेत. बाळासाहेब आमच्या सगळ्या कट्टर शिवसैनिकांचे कुटुंबप्रमुख होते. वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरशात बघावे. यांची बेईमानी आणि कोलांट्याउड्या पाहून आरशालाही लाज वाटेल, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कलम ३७० हटवणे, राम मंदीर उभारणे हे बाळासाहेबांचे आणि करोडो हिंदुंचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मागील १० वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 23, 2024 11:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Eknath Shinde : ‘हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती’ शिंदेंची ठाकरेंवर खरमरीत टीका


