‘इन्स्टा’वाली लव्हस्टोरी! 13 वर्षांच्या मुलीनं BF साठी रात्रीत गुजरात गाठलं, भाऊबीजेला सगळंच फसलं!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील 13 वर्षीय मुलगी इन्स्टावरून गुजरातमधील तरुणाच्या प्रेमात पडली. घर सोडून तिनं रात्रीत सुरत गाठलं. पुढे दीड वर्षानं वेगळंच घडलं.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागातील एका साधारण कुटुंबात राहणारी 13 वर्षीय समीक्षा (नाव बदललेले) शाळेत शिकत होती. तिचे आई-वडील खासगी नोकऱ्या करून संसार चालवतात. आईच्या मोबाइलवरील इन्स्टाग्रामवरून समीक्षाची ओळख गुजरातमधील आकाश नावाच्या तरुणाशी झाली. आकाशने आपले आकर्षक फोटो आणि स्टाइलिश पोस्ट्स टाकून तिला प्रभावित केले. हळूहळू त्यांच्यातील चॅटिंग वाढली आणि समीक्षा त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली.
6 जानेवारी 2024 रोजी समीक्षा अचानक घरातून निघून गेली. ती रात्रीच्या ट्रॅव्हल्सने थेट सुरतला पोहोचली. पण प्रत्यक्षात आकाशच्या आयुष्याची वास्तविकता वेगळीच होती. तो एका छोट्या चाळीत राहात होता, आई-वडील दोघांचेही निधन झालेले. तो एका कंपनीत फक्त ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. समीक्षाला पहिल्या भेटीतच धक्का बसला, पण पळून आल्याने परत कसे जायचे हा प्रश्न तिला पडला. शेवटी तिने आकाशसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दुसरीकडे, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याचा गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला अपहरणाचा संशय घेऊन तपास सुरू झाला, पण तीन महिन्यांत काहीच हाती न लागल्याने प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आले. सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी, अंमलदार विठ्ठल मानकापे, हिरा चिंचोळकर, पुनम परदेशी आणि रामदास गव्हाणे यांच्या पथकाने सातत्याने तिच्या शोधासाठी प्रयत्न केले.
advertisement
समीक्षाला कुटुंबाची आठवण येऊ लागली. तिने इन्स्टाग्रामवर निनावी अकाउंट तयार करून आपल्या भावाशी संपर्क साधला. ती नेहमी पालकांबद्दल विचारणा करायची, ज्यामुळे भावाला शंका आली. त्याने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून प्रोफाइल समीक्षाचेच असल्याचे निश्चित केले आणि त्यावर पाळत ठेवली.
अखेर 23 ऑक्टोबरला भाऊबीजेच्या निमित्ताने समीक्षा आणि आकाश शहरात येऊन भावाला भेटण्याच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तात्काळ कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. अपहरणाच्या गुन्ह्यात आकाशला अटक करण्यात आली, तर समीक्षाला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Oct 31, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‘इन्स्टा’वाली लव्हस्टोरी! 13 वर्षांच्या मुलीनं BF साठी रात्रीत गुजरात गाठलं, भाऊबीजेला सगळंच फसलं!










