ज्यांना संभाजीनगरचं 'उडता पंजाब' करायचंय त्यांना खाकी वर्दीने अद्दल घडवली, मोठा दणका
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तरुणाईला नशेच्या दलदलीत लोटणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरात नशेच्या औषधींचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीला अद्दल शिकवण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. शहरातील मोती कारंजा परिसरात काढण्यात आलेली ही धिंड सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातून मोठ्या प्रमाणावर नशेच्या औषधींची तस्करी होत असल्याचे उघड झाले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून टोळीतील काही जणांना अटक केली. तपासादरम्यान या टोळीतील एकूण 41 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 12 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींवर कठोर कारवाई करत पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांची धिंड काढली.
advertisement
नशेच्या दलदलीत लोटणाऱ्यांची गय नाही
मोती कारंजा येथे झालेल्या या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. मान खाली घालून आरोपी चालत होते. यापुढे तरुणाईला नशेच्या दलदलीत लोटणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे. शहरात आणि परिसरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यवहारावर आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अवलंबलेला हा पॅटर्न लोकांना आश्वस्त करणारा ठरला आहे.
advertisement
आरोपींचा शोध सुरू
नशेच्या औषधींमुळे तरुणाईचे भविष्य धोक्यात येत असल्याने अशी तस्करी समाजासाठी घातक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. प्रतिबंधक पथकाच्या धाडसी कारवाईनंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. नागरिकांनीही अंमली पदार्थ विक्रेत्यांविषयी काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.
advertisement
नशेखोरांना धडा शिकवला
अशा प्रकारे धिंड काढण्याची कारवाई राज्यातील इतर भागातही राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. समाजाच्या भल्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मानले जात असून यामुळे नशेखोरांना धडा शिकवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्यांना संभाजीनगरचं 'उडता पंजाब' करायचंय त्यांना खाकी वर्दीने अद्दल घडवली, मोठा दणका